ही आहेत विष्णूची पंचबद्री स्थाने


महादेवाची जशी पंच केदार स्थाने आहेत तशीच भगवान विष्णूची हिमालयात पंचबद्री स्थाने असून या पंचबद्री स्थानांना धर्मग्रंथात दुसरे वैकुंठ म्हटले गेले आहे. या सर्व स्थानी सुद्धा बद्रीनाथ मंदिराप्रमाणे कपाट उघडणे आणि बंद करणे अश्या परंपरा आहेत मात्र त्यातील काही स्थाने वर्षभर भाविकांसाठी खुली असतात.

या स्थानातील पहिले आहे प्रसिद्ध ब्रद्रीनाथ मंदिर. समुद्रसपाटीपासून ३१३३ मीटर उंचीवर असलेले हे भूवैकुंठ या वर्षी १० मे पासून खुले झाले आहे. आदि शंकराचार्यांनी आठव्या शतकात या मंदिराची निर्मिती केली असून आजही येथे नाम्बुद्रीपाद पुजारी आहेत. येथील पुजारीना रावल म्हटले जाते आणि ते अविवाहित राहतात. जे पुजारी विवाह करतात त्यांना पूजा अधिकार सोडवा लागतो. असे मानले जाते जो भाविक बद्रीनाथ दर्शन करतो त्याला तप, योग, समाधी व संपूर्ण तीर्थ दर्शनाचे फळ फक्त या एका दर्शनाने मिळते.


ध्यान बद्री हे दुसरे स्थान हरिद्वार पासून उर्गम घाटी कडे जाताना हेलंग पासून १० किमीवर आहे. हे मंदिर कत्युरी शैलीत बांधले गेले असून मंदिरातील मूर्ती शाळीग्राम शिलेपासून बनली आहे. ही मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. विष्णूसोबत डावीकडे महालक्ष्मी आणि उजवीकडे गणेश व नारद यांच्या मूर्ती आहेत.


वृद्ध बद्री हे तिसरे स्थान जोशीमठ आणि हेलंग यांच्या मध्ये असून पुराणात ही नारदाची तपस्या भूमी आहे असे उल्लेख आहेत. येथे विष्णूनी नारदाला त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन वृद्ध रुपात दर्शन दिले होते त्यामुळे त्याला वृद्ध किंवा बुढा बद्री नावाने ओळखले जाते.


योग बद्री हे चौथे स्थान महाभारताशी संबंधित आहे. येथे विष्णू योगी रुपात आहे. याची अशी कथा सांगतात याच जागी पांडू राजाने मृगरुप घेतलेला ऋषी त्याच्या पत्नीसोबत एकांतात असताना हरीण समजून त्याची शिकार केली होती. तेव्हा संतापलेल्या या ऋषीने पांडूला तू तुझ्या पत्नीसोबत एकांतात असशील तेव्हा तुझा मृत्यू होईल असा शाप दिला. शापातून मुक्ती मिळावी म्हणून पांडूने येथे तपस्या केली होती, पाच पांडवांपैकी नकुल आणि सहदेव यांचा जन्म येथे झाला असे मानतात. पांडूला येथेच विष्णूने दर्शन दिल्याने या ठिकाणाला पांडूकेश्वर असेही म्हणतात.


भविष्य बद्री हे सध्याच्या बद्रीचे भविष्यातील स्थान मानले जाते. असा समज आहे कि सध्याच्या बद्री मंदिरामागील नर आणि नारायण हे दोन पर्वत कोसळून बद्री मंदिराचा नाश होणार आहे. तेव्हा बद्रीचे पुढील स्थान येथे असेल. हे स्थान सध्याच्या बद्रीनाथ मंदिराजवळ असून त्याची स्थापना आदि शंकराचार्यानीच केली आहे. बद्री मंदिराबरोबरच या मंदिराचे कपाट बंद केले जाते आणि उघडले जाते. येथे जन्माष्टमीच्या दिवशी यात्रा भरते आणि दर तीन वर्षांनी मेळा होतो त्याला जाख मेळा म्हटले जाते.

Leave a Comment