यामुळे विरल आचार्य यांना द्यावा लागला राजीनामा


मुंबई – भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ संपण्यास सहा महिने बाकी असतानाच आपल्या पदाचा राजीनामा दिला. आचार्य यांनी व्यक्तिगत कारणास्तव पद सोडत असल्याचे म्हटले आहे. पण, मतभेदामुळेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वायत्ततेवर ठाम असलेले आचार्य यांनी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे. आचार्य यांनी गेल्या वर्षी केलेल्या एका भाषणातून सरकारच्या धोरणांवर त्यांनी थेट टीका केली होती आणि त्यावरुनच रिझव्‍‌र्ह बँक आणि सरकारचे वेगवेगळ्या प्रश्नावर खटके उडायला सुरूवात झाल्याचे म्हटले जाते.

अनेकदा सरकार, अर्थ मंत्रालय यांच्यावर आचार्य यांनी टीका करून बँकेच्या स्वायत्ततेचा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबईतील गिरगावचे आचार्य हे असून मुंबईतच गेल्या वर्षी २६ ऑक्टोबरला झालेल्या एका व्याख्यानात त्यांनी केलेले मतप्रदर्शन वादळी ठरले होते. त्यांनी केंद्र सरकारची धोरणे टी-20 सामन्याप्रमाणे असल्याचे म्हटले होते. सरकारने रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केल्यास भांडवली बाजार तसेच, अर्थव्यवस्थेचे खच्चीकरण होईल, असे त्यांनी म्हटले होते.

त्यांनी ए. डी. श्रॉफ स्मृती व्याख्यानात असे सांगितले होते की, सरकारच्या निर्णय प्रक्रियेचा आवाका लहान असून त्यात मोठा राजकीय प्रभाव आहे. त्यांचे हे भाषण रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाच्या बैठकीच्या तीनच दिवसांनंतर झाले होते. त्यांनी आपल्या सुमारे दीड तासाच्या भाषणात जे सरकार आपल्या केंद्रीय बँकांच्या स्वायत्ततेचा आदर राखत नाही त्यांना कधी ना कधी बाजारपेठांच्या रागाला सामोरे जावेच लागते, असे म्हटले होते. सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये या भाषणाच्या काही काळ आधीच अनेक मुद्द्यांवरून मतभेद झाले होते . आचार्य यांनी असेही सांगितले होते की, रिझव्‍‌र्ह बँकेची स्वायत्तता कमी केल्यास त्याचा परिणाम भांडवली बाजारांच्या आत्मविश्वासावर होऊ शकतो आणि बिकट परिस्थिती उद्भवू शकते.

Leave a Comment