धोनीवर टीका केल्यामुळे ट्रोल झाला क्रिकेटचा देव


नवी दिल्ली – अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये धोनीच्या संथ खेळीसंदर्भात केलेल्या टिप्पणीवरुन क्रिकेटचा देव आणि विक्रमांचा विक्रम करणारा सचिन तेंडुलकर नुकताच ऑनलाइन ट्रोलर्सचा नवा टार्गेट ठरला.

भारताने अफगाणिस्तानसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध खेळताना खूपच धिम्या गतीने फलंदाजी केली. यावर मधल्या फळीतील फलंदाजांवर नाराज झालेल्या सचिनने टिका केली. सचिनने धोनी त्याचबरोबर केदार जाधव यांच्यामध्ये सकारात्मक विचारसरणी दिसत नाही अशी टिका केली. भारताचे सलामीवीर विश्वचषक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच अयशस्वी ठरल्यानंतर कोहलीने ६७ धावांची खेळी केल्याने भारताला २२४ धावांपर्यंत मजल मारता आली. मधल्या फळीतील फलंदाजांनी अगदीच संथ गतीने फलंदाजी केल्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खूपच नाराज झाला.

इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने ही नाराजी बोलून दाखवली. मी थोडा निराश झालो. यापेक्षा चांगली धावसंख्या उभारता आली असती. मी धोनी आणि केदार जाधवच्या भागीदारीबद्दलही नाखुश आहे. ते खूपच संथ खेळले. पण फिरकी गोलंदाजीची ३४ षटके खेळलो. त्यामध्ये आपण केवळ ११९ धावा केल्या. भारतीय संघ मधल्या फळीमध्ये कमकुवत दिसतो. सकारात्मक इच्छाशक्तीचा मधल्या फळीतील फलंदाजांकडे आभाव वाटल्याचे सामन्याचे विश्लेषण करताना सचिन म्हणाला.

धोनीच्या या संथ खेळीवर अनेकांनी टिका केली असली तरी धोनीचे चाहते सचिनच्या टीकेनंतर चांगलेच खवळले आहेत. सचिनलाच चार गोष्टी अनेकांनी ट्विटवरुन सुनावल्या आहेत. अनेकांनी सचिन आणि धोनीची तुलना करणारे मिम्स ट्विटवर पोस्ट केले आहेत. दबावाखाली धोनी हा सचिनपेक्षा चांगलाच खेळतो अशा टोला धोनीच्या चाहत्यांनी या मिम्सच्या माध्यमातून लगावला आहे.

Leave a Comment