बिग बॉसचे सुत्रसंचालन करण्यासाठी सलमान घेणार ऐवढे मानधन?


यंदा आपले 13 वे पर्व घेऊन कलर्स हिंदी वाहिनीवरील सर्वात वादग्रस्त, चर्चित आणि तितकाच लोकप्रिय असलेला रिअॅलिटी शो बिग बॉस येत आहे. या शोचे सुत्रसंचालन सालाबादप्रमाणे याही वेळी अभिनेता सलमान खान हाच करणार आहे. सलमान खान या शोचे सुत्रसंचालन करण्यासाठी घेणाऱ्या मानधनाची रक्कमही प्रसारमाध्यमांतून जाहीर झाली आहे. बिग बॉस 13 चे सुत्रसंचालन करण्यासाठी सलमान खानला मिळणारे मानधन हे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 100 कोटी रुपयांनी अधिक असणार आहे.

बिग बॉस 13 बद्दल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवनवीन माहित समोर येत आहे. ज्यात कधी या वेळी बिग बॉसच्या घरात दिसणाऱ्या स्पर्धकांची नावे असतात तर, कधी वाईल्ड कार्ड एण्ट्रीबंद्दल अंदाज असतात. आता तर अनेकांसाठी महत्त्वाची असलेली अपडेट आली आहे. या शोचे सुत्रसंचालन करण्यासाठी अभिनेता सलमान खानला कलर्स वाहिनीकडून तब्बल 403 कोटी रुपये मिळणार आहेत. बिग बॉस 12 च्या तुलनेत ही रक्कम तब्बल 100 कोटी रुपयांनी अधिक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस 12चे सुत्रसंचालन करण्यासाठी सलमान खान याने कलर्स वाहिनीकडून मानधनाच्या रुपात सुमारे 300 ते 350 कोटी रुपये मिळाले होते. पण सलमान खानने बिग बॉस 13 साठी आपल्या मानधनात 100 कोटी रुपयांची वाढ केल्याचे वृत्त आहे.

याबाबत इतर प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सांगायचे म्हटले तर, सलमान खान ‘बिग बॉस 13’ होस्ट करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला दोन एपिसोडसाठी 31 कोटी रुपये आहे. साधारण एकूण शोमध्ये 13 विकेंड असतील. या हिशोबाने आकडेमोड करायची तर सलमान खान बिग बॉस सीजन 13 साठी 403 कोटी रुपये घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बिग बॉस शोचे सुत्रसंचालन करण्यासाठी मिळणाऱ्या मानधनाबाबत स्वत: सलमान खान अथवा कलर्स वाहिनी किंवा बिग बॉस यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पण मानधनाबाबत प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात भाष्य करण्यात आले आहे.

Leave a Comment