२०० कोटीच्या विवाहसोहळ्यात जमा झाला तब्बल १५० क्विंटल कचरा


ऑली – उद्योगपती अजय गुप्ता यांचा मुलगा सुर्यकांत याचा विवाहसोहळा उत्तराखंड येथील ऑली येथे नुकताच पार पडला होता. तब्बल एक दोन नव्हे तर, २०० कोटी रुपये या विवाहसोहळ्यासाठी खर्च करण्यात आला होता. भारतासह जगभरात या विवाहसोहळ्याची चर्चा झाली. पण या विवाहसोहळ्यानंतर येथे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

तेथील महापालिकेने २० कामगारांना विवाहसोहळा झाल्यानंतर कचरा साफ करण्यासाठी कामाला लावले आहे. यासाठी गुप्ता कुटुंबियांनी ५४ हजार रुपये दिले आहेत. तब्बल १५० क्विंटल कचरा आतापर्यंत साफ करण्यात आला आहे. गुप्ता कुटुंबीयांना सर्व सफाई झाल्यानंतर खर्चाचे बिल देण्यात येणार आहे. यासाठी गुप्ता कुटुंबही तयार आहे. त्यांनी मदत करण्यासाठी महापालिकेला वाहनाची मदतही पुरवली आहे.

ऑली येथील पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विवाहसोहळ्याच्या तयारीमुळे धोका पोहचत आहे, अशी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाला यासंबंधी ७ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर ८ जुलैला याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.

अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, बॉलीवूड कलाकार आणि योगगुरू रामदेव बाबा विवाहसोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी रामदेव बाबांनी २ तासांसाठी योगाचे प्रशिक्षण शिबीरही घेतले होते. हेलिकॉप्टर्सचा पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी बंदोबस्त करण्यात आला होता. पाहुण्यांसाठी ऑली येथील जवळपास सर्वच हॉटेल आणि रिसॉर्टचे बुकींग करण्यात आले होते. विवाहसोहळ्याच्या सजावटीसाठी स्वित्झर्लंडवरुन फुले मागवण्यात आली होती.

Leave a Comment