गुजराथच्या या गावात तरुण पिढी मोबाईल पासून दूर


भारतात मोदी सरकारने डिजिटल क्रांतीची घोषणा केली आणि देशात मोबाईल विक्रीचे नवे आकडे नोंदले जाऊ लागले तसेच सर्वसामान्य माणसाच्या हातात मोबाईल दिसू लागले. आता तर एका मोबाईलवर सुद्धा लोकांचे भागत नाही त्यामुळे एकाकडे दोन मोबाईल सुद्धा सहज दिसतात. मोबाईल हा माणसाच्या आयुष्याचा आवश्यक घटक बनला असताना एका गावातील तरुण पिढी मोबाईल पासून दूर आहे असे सांगितले तर त्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. पण डिजिटल क्रांती घडविणाऱ्या मोदींच्या गुजराथ मध्येच हा चमत्कार घडला आहे.

गुजराथचा मेहसाणा मधील एका गावात १८ वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यावर बंदी घातली गेली आहे. गावाच्या सरपंचानी हा निर्णय घेतला आणि त्याला सर्व पंचायत सदस्यांनी एक मुखाने संमती दिली. गाव सरपंचांना त्याबद्दल धन्यवाद देत आहे आणि त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अन्य काही गावेही याचे अनुकरण करण्यास तयार झाली आहेत असेही समजते.


विशेष म्हणजे गावातल्या मुलांनी मोबाईल बंदी सकारात्मक पद्धतीने स्वीकारली आहे. गावाच्या सरपंच अंजना पटेल सांगतात गावात अश्या काही घटना घडल्या ज्यामागे मोबाईल हेच कारण होते. तेव्हा आम्ही पंचायत बोलावली आणि एकमताने १८ वर्षाखालच्या मुलांना मोबाईल वापरास बंदी करण्याचा निर्णय घेतला.

याबाबत मुलांचा प्रतिसाद सुरवातीला विरोधी होता. या मुलांचे म्हणणे असे कि सुरवातीला मोबाईलविना जगायचे कसे याची काळजी वाटत होती कारण मोबाईल नुसता डिस्चार्ज झाला तरी आम्ही बेचैन होत होतो. मोबाईल हेच जीवन बनले होते त्यामुळे बंदी घातली गेली तेव्हा बेचैन झालो, त्रास होत होता, राग येत होता पण आता सर्व ठीक आहे. उलट बिनामोबाईल आयुष्य अधिक सुंदर, सरळ आणि साधे झाले आहे. पूर्वी मोबाईलवर दिवसातले तासनतास वाया जायचे आता आम्ही अभ्यासात लक्ष देतो, मोकळ्या वेळात खेळतो, एकमेकांशी गप्पा मारतो. त्यामुळे आमच्या गावाकडून शेजारची गावे प्रेरणा घेत आहेत याचा आनंद वाटतो.

Leave a Comment