बँकॉकच्या परीवट बुद्ध मंदिरात बेकहमची सोन्याची मूर्ती स्थापन


थायलंडची राजधानी बँकॉक मध्ये शेकड्याने बुद्ध मंदिरे आहेत आणि त्यातील काही चांगलीच प्रसिद्ध आहेत. येथील परीवट बुद्ध मंदिरात नुकतीच प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम याची सोन्याची मूर्ती स्थापन करण्यात आली असून ते पर्यटकांसाठी खास आकर्षण बनले आहे. वास्तविक ही मूर्ती २० वर्षापूर्वी बनविली गेली होती मात्र तिची स्थापना नुकतीच केल्याचे सांगितले जात आहे. ही मूर्ती एका फुटबॉलप्रेमी थाई मूर्तीकाराने बनविली आहे. मठाच्या उपमठाधीपती बूनरेडंग यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मूर्ती १९९९ साली बनविली गेली होती.


याच साली म्हणजे १९९९ मध्ये मॅनचेस्टर इंग्लिश क्लबने एका सिझन मध्ये सलग ३ ट्रॉफीज जिंकल्या होत्या आणि युइएफए चँपियन लीगसुद्धा जिंकली होती. १९९८-९९ हा सिझन मॅनचेस्टर इंग्लिश क्लबच्या इतिहासातील अभूतपूर्व यशाचा सिझन ठरला होता. बेकहम मॅनचेस्टर इंग्लिश क्लबकडून खेळत असे आणि तो इंग्लंडच्या राष्ट्रीय टीमचा कप्तान होता. त्याने जागतिक कीर्ती मिळविली असून त्याचा चाहता वर्ग जगभरात आहे. थायलंडचा हा मूर्तिकार बेकहमचा चाहता होता म्हणून त्याने त्यावेळी त्याची मूर्ती बनविली होती. या मूर्तीच्या अंगावर त्या वेळचा फुटबॉलचा ट्रेडमार्क असलेली जर्सी आहे.

या मंदिरात बेकहमची मूर्ती हिंदू मंदिरात गरुड मूर्ती असते तशी आहे. बेकहम बरोबर येथे पॉप कल्चरमधली अनेक नामवंत कॅरेक्टर्स मूर्ती रुपात असून त्यात वूल्बरीन, सुपरमॅन, पिकाचो असे अनेक आहेत. सुपरस्टार हे नेहमी चांगुलपणाचे प्रतिक असतात आणि संकटातील लोकांना मदतीचा हात देतात. या भावनेतून या मंदिरात अश्या मूर्ती बसविल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामुळे येथे पर्यटक येण्याची प्रमाण वाढले असून या मूर्ती पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनल्या आहेत.

Leave a Comment