गोगलगाईने केली जपानी रेल्वे ठप्प


जपान रेल्वे सेवा जगातील उत्तम प्रतीची रेल्वेसेवा तर आहेच पण जपानी रेल्वे कधीही लेट होत नाही असा त्यांचा लौकिक आहे. अगदीच एखाद्यावेळी, एखाद्या सेकंदाने गाडी लेट झाली तर रेल्वे प्रशासन जनतेची सार्वजनिक माफी मागते अशी या देशाची पद्धत. वेळेबाबत इतके काटेखोर असणाऱ्या जपानला एका गोगलगाईमुळे तब्बल २६ ट्रेन रद्द कराव्या लागल्याची घटना नुकतीच घडली. यामुळे १२ हजार प्रवाशांची गैरसोय झाली.

मिळालेल्या माहितीनुसार द. जपान मधील वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने क्यूशु रेल्वे कार्पोरेशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या रेल्वेसेवा ३० मे रोजी प्रभावित झाल्या. त्यात २६ गाड्या रद्द करण्यची पाळी कंपनीवर आली आणि त्यामुळे १२ हजार प्रवाशांना त्रास सोसावा लागला. वीजपुरवठा का बंद पडला याची चौकशी आणि तपास त्वरित सुरु करण्यात आला आणि त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला तेव्हा वीज बंद होण्यामागे एक गोगलगाय कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष काढला गेला. रेल्वे बंद झाल्याने अन्य सेवाही प्रभावित झाल्या आणि काही गाड्या उशिरा सुटल्या. परिणामी रेल्वेस्टेशन वर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते असे समजते.


जेव्हा वीजपुरवठा अचानक बंद झाला तेव्हा पॉवर सिस्टीम मध्ये एखादा कीटक शिरला असावा असा अंदाज बांधला गेला आणि दुरुस्ती कर्मचाऱ्यांनी त्वरित डिस्कनेक्टर स्वीच बॉक्स खोलला. हा स्वीच दुरुस्तीची काही कामे करायची असतील तर वीजप्रवाह दुसरीकडे वळविण्यासाठी उपयुक्त असतो. या स्वीच मध्ये एखादा किडा, कीटक जाऊ नये यासाठी तो चोहोबाजूंनी सील केलेला असतो. मात्र हा स्वीच बॉक्स रेल्वे दुरुस्ती पथकाने उघडला तेव्हा आत मरून पडलेली एक गोगलगाय दिसली. तिला विजेचा शॉक बसला असावा असा अंदाज केला गेला.


ऐन गर्दीच्या वेळी सकाळी ९ वा.४० मिनिटांनी वीज गेल्याने रेल्वे वाहतूक मोजी व स्पेस वल्ड स्टेशन दरम्यान बंद झाली त्याचे कारण ही गोगलगाय आहे असे रेल्वे कंपनीने जाहीर केले. ही गोगलगाय डिस्कनेक्टर स्वीच बॉक्स मध्ये कशी शिरली याचे स्पष्टीकरण दिले गेले नसले तरी तिचा स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाले आणि वीज गेली असे सांगितले गेले आहे. यापूर्वी हरीण अथवा तत्सम प्राणी रेल्वेला धडकल्याने काही वेळा रेल्वे सेवा बंद पडली होती मात्र एका छोट्या किड्यामुळे जपानी रेल्वे ठप्प होण्याची ही पहिलीच घटना आहे.

Leave a Comment