उधारी भागविण्यासाठी ट्रॉफीज विकणार बोरिस बेकर


लॉन टेनिस मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी प्रतिष्ठित विम्बल्डन स्पर्धा जिंकून रेकॉर्ड करणारा आणि हे रेकॉर्ड आजही कायम असलेला जर्मनीचा टेनिसपटू बोरिस बेकर आज वयाच्या ५१ व्या वर्षी पैशासाठी मोताद झाला असून त्याची अवस्था इतकी वाईट आहे कि त्याने उधारी फेडण्यासाठी त्याच्या ट्रॉफीज, स्मृतीचिन्हे, घड्याळे, फोटो अश्या वस्तू लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. हा लिलाव ११ जुलै पर्यंत सुरु राहणार आहे. या लिलावासाठी त्याने ऑनलाईन लिलावात माहीर असलेल्या ब्रिटीश फर्म वेलेस हार्डी यांची निवड केली आहे.


या कंपनीच्या वेबसाईटवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार बेकरने त्याच्या ८२ खास वस्तू लिलावासाठी दिल्या आहेत. त्यात मेडल्स, कप्स, घड्याळे, फोटोग्राफ आहेत. यात त्याने जिंकलेल्या चॅलेंज कपची प्रतिकृती, रेनशो कपची प्रतिकृती अश्या ट्रॉफी आहेत. रेनशो ट्रॉफी त्याला सर्वात तरुण ग्रांडस्लॅम सिंगल चँपियन बनल्यावर दिली गेली होती. १९९० मध्ये त्याला स्टीफन एडबर्ग कडून हर पत्करावी लागल्यानंतर दिलेले विम्बल्डन फायनलिस्ट मेडल आणि युएस ओपन सिल्व्हर कप रीप्लीकाही लिलावात ठेवली गेली आहे.

टेनिस जगतात बुमबूम बेकर या टोपण नावाने प्रसिद्ध झालेल्या बेकरने २०१७ मध्ये तो दिवाळखोर झाल्याचे जाहीर केले होते. लिलावातील वस्तू विकूनही त्याचे कर्ज फिटणारे नाही असे जाणकार सांगतात. त्याच्यावर लाखो पौंडांचे कर्ज आहे. बोरिसने त्याच्या कारकिर्दीत सहा ग्रांडस्लॅम आणि ४९ खिताब मिळविले होते आणि त्यातून त्याने २ कोटी युरोची रक्कम बक्षीस म्हणून मिळविली होती. १९८५ मध्ये त्याने प्रथम विम्बल्डन जिंकले होते.

Leave a Comment