बिहारमधील चमकी मागचे कारण शोधणार एम्स


नवी दिल्ली – चमकी तापाचा कहर अद्यापही बिहारमध्ये सुरुच असल्यामुळे या तापमुळे दगावणाऱ्यांचा आकडा १८० वर पोहोचला आहे. या गंभीर तापाच्या धोक्यातून अद्यापही ३०० जण बाहेर आलेले नाहीत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या पार्श्वभूमीवर या महामारीमागची कारणमीमांसा करणार आहे. त्यांनी त्यासाठी या रोगाचे ‘अज्ञात’ असे त्याचे वर्गीकरण केले आहे.

या प्रकल्पावर पुढील महिन्यात काम सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण आणि इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. ही सीएसआर कार्यक्रमातून पैसा पुरवणार आहे. अशाच प्रकारच्या ११ प्रकल्पांवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था काम करत आहे. या सर्व प्रकारच्या रोगांवर ज्यामध्ये संशोधन केले जात आहे. यामध्ये वयवर्ष १ ते १८ पर्यंतच्या मुलांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

या रोगाची अ‍ॅक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोम अशी व्याख्या केली आहे. त्याचा अर्थ विषाणू, जिवाणू, बुरशी, परोपजीवी, रासायनिक विषे यातून येणारा ताप असा आहे. वेल्लोर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे विषाणू तज्ज्ञ प्राध्यापक डॉ. टी. जे.जॉन यांच्या मते या संज्ञेला काही अर्थ नाही कारण अशा पद्धतीने कोणताही मेंदूविकार यात बसवता येईल. त्यांच्या मते यात वेगवेगळे रोग येतात. त्यात एन्सेफलायटिस, मेनिंजायटिस, एन्सेफलोपॅथी, सेरेब्रल मलेरिया यांचा समावेश होता पण अधिक अचूक व्याख्येची गरज आहे.

Leave a Comment