विंडीज दौऱ्यासाठी कोहली, जसप्रीतला आराम


मुंबई – भारतीय संघ आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर १५ दिवसांनी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात ३ टी-२०, ३ एकदिवसीय सामने आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या दौऱ्यासाठी विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे. आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत या दोन कसोटींचा समावेश आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. टी-२०, वन-डे मालिकेत विराट आणि जसप्रीतला विश्रांती देण्यात येईल हे जवळपास नक्की आहे. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपासून सतत क्रिकेट खेळत आहे. तर अति क्रिकेटमुळे बुमराहवर येणारा ताण हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. पण हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेसाठी खेळणार असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

बीसीसीआय विराट आणि बुमराह सोबत आणखी काही खेळाडूंनाही विश्रांती देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान भारतीय संघ सद्या विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळत असून भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश मिळवेल असा विश्वास व्यक्त होत आहे. जर असे झाल्यास भारतीय संघ जुलै महिन्याच्या १४ तारखेपर्यंत इंग्लडमध्ये राहिल. या सर्व बाबीचा विचार करुन विंडीज दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Leave a Comment