काँग्रेसने केली ‘अभिनंदन’ यांच्या मिशा ‘राष्ट्रीय मिशा’ जाहीर करण्याची मागणी


नवी दिल्ली – या महिन्याच्या १७ तारखेपासून मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात यावा अशी मागणी केली. त्याबरोबर त्यांनी अभिनंदन यांच्या मिशांची स्टाइल ही ‘राष्ट्रीय मिशा’ म्हणून घोषित करावी अशीही मागणी केली.

चौधरी यांनी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी अभिनंदन यांना पुरस्कार देण्याची मागणी लोकसभेत केली. त्याचबरोबर अभिनंदन यांच्या मिश्यांची स्टाइल ही राष्ट्रीय मिशा म्हणून घोषित करण्यात यावी अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने त्यांनी केली.

लोकसभेतील आपल्या भाषणामध्ये चौधरी यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजपला ‘टू जी घोटाळा तसेच, कोळसा घोटाळ्यात काही सिद्ध करता आले का?, तुम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना तुरुंगात टाकू शकलात का? त्यांना तुम्ही चोर म्हणत सत्तेत आलात मग ते येथे लोकसभेत निवडूण येऊन कसे काय बसले आहेत?, असे सवाल चौधरी यांनी भाजपला विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी चौधरी यांचे भाषण संपल्यानंतर लोकसभेतून काढता पाय घेतला.

Leave a Comment