मुंबईत ब्लॅकस्टोनने ऑफिस खरेदीसाठी मोजले २५०० कोटीं


अमेरिकन कंपनी ब्लॅकस्टोनने मुंबईच्या १ बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये २५०० कोटी रुपये मोजून ऑफिस साठी जागा खरेदी केले असल्याचे समजते. देशात ऑफिस स्पेस मधील हे सर्वात मोठे डील ठरले आहे. ब्लॅकस्टोनने रेडीयस डेव्हलपर कडून या इमारतीत ७ लाख चौरसफुट जागा ए विंग मध्ये घेतली आहे. या इमारतीच्या ए विंग मध्ये एकूण १५ लाख चौरसफुट बांधकाम केले गेले आहे. सेन्ट्रल बिझिनेस डीस्ट्रीक्ट नंतर या इमारतीतील ऑफीस स्पेसना सर्वाधिक मागणी आहे असे सांगितले जाते.

या इमारतीच्या ए विंग मध्ये बँक ऑफ अमेरिका, ट्रॅफीगुरा, सिस्को, फेसबुक, अमेझॉन, आयसीबीसी, श्री सिमेंट, मदरसन, हिताची, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल अश्या कंपन्यांची कार्यालये आहेत. ब्लॅकस्टोन ही अमेरिकन कंपनी २००५ पासून भारतात बहुतेक सर्व क्षेत्रात गुंतवणूक करते आहे. त्यांनी आत्तापर्यंत १०.४ अब्ज डॉलर्सची भारतात गुंतवणूक केली आहे. गेली काही वर्षे भारतातील सर्व सेक्टर मध्ये कंपनी गुंतवणूक करत असून गेल्या चार वर्षात ६.६ अब्ज डॉलर्स गुंतविले गेले आहेत.

भारताच्या रिअॅलिटी मार्केटमध्ये ब्लॅकस्टोन सर्वात मोठी परदेशी गुंतवणूकदार कंपनी बनली असून या क्षेत्रात कंपनीने ५.४ अब्ज डॉलर्स म्हणजे ३७८०० कोटी रुपये गुंतविले आहेत. त्यात ४ अब्ज डॉलर्स ए ग्रेड व्यावसायिक कार्यालय खरेदी साठी खर्च केले गेले आहेत. ब्लॅकस्टोनने या वर्षी एप्रिल मध्ये पॅकेजिंग कंपनी एस्सेल प्रोपॅक मध्ये ३२११ कोटीचा मोठा हिस्सा खरेदी केल्याची घोषणा केली आहे. फेब्रुवारी मध्ये आधार हौसिंग फायनान्समध्ये कंपनीने ३ हजार कोटी गुंतवून ९७.७ टक्के भागीदारी मिळविली आहे.

Leave a Comment