गोपीचंद कन्या गायत्रीचा डबल धमाका


राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक आणि साईना नेहवाल, पीव्ही सिंधू, किदंबी श्रीकांत यांच्यासारखे दर्जेदार खेळाडू घडविणारे पुल्लेला गोपीचंद यांची कन्या गायत्री भारतीय बॅडमिंटनचे नवे आशास्थान म्हणून वेगाने मार्गक्रमणा करत आहे. १६ वर्षीय गायत्रीने ऑल इंडिया सिनियर रँकिंग टूर्नामेंट मध्ये बहारदार खेळाचे दर्शन घडविताना दोन खिताब जिंकले आहेत. या आठवड्यात पार पडलेल्या या स्पर्धात गायत्रीने महिला सिंगल्स आणि महिला डबल्स खिताब जिंकले आहेत.

गायत्रीला १३ वे रँकिंग होते. तिने चौथ्या क्रमांकावर असलेल्या तन्वी लाड हिला २१-१९,२१-१६ असे दोन सेट मध्ये पराभूत करून महिला सिंगल्स अजिंक्यपद मिळविले. हा सामना तिने केवळ ३७ मिनिटात संपविला. तिची ही पहिलीच सिनिअर रँकिंग ट्रॉफी आहे. महिला डबल्स मध्ये तिने ऋतुपर्णा पांडासह खेळताना राष्ट्रीय चँपीयन शिखा गौतम व अश्विनी भात यांना १९-२१, २१-१४, २१-१० असे हरविले आणि महिला डबल्स ट्रॉफी जिंकली,


गायत्री १५ व्या वर्षीच इंडोनेशिया येथे झालेल्या एशियन गेम्स मध्ये सहभागी झाली होती. तिचे खेळातील कौशल्य पाहून तिला बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने भारताच्या टीम मध्ये सहभागी होण्याची संधी दिली होती. ज्युनिअर वर्ल्ड एशियन चँपियन शिपमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

यंदाचा पुरुष एकेरीचा खिताब सहावे रँकिंग मिळालेल्या लक्ष्य सेन याने जिंकला त्याने दोन नंबरच्या राहुल यादव याचा पराभव केला. गोपीचंद यांचा मुलगा साई विष्णू हाही बॅडमिंटनचे धडे गिरवत असून त्याची प्रगती उत्तम आहे असे समजते.

Leave a Comment