स्मृती इराणी होणार अमेठीच्या रहिवासी


केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी यांनी त्या अमेठीच्या रहिवासी होत असल्याचे शानिवारी राजा विश्वनाथसिंग कॉलेज मधील उद्घाटन कार्यक्रमात बोलताना जाहीर केले. त्या म्हणाल्या, आम्ही गौरीगंज भागात घर बांधण्यासाठी जागा पाहिली आहे आणि येथे घर बांधून मी कायमच्या वास्तव्यासाठी अमेठी येथे येणार आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघासाठी मी नेहमी उपलब्ध असेन आणि माझ्या मतदाराच्या सहवासात राहण्याचा आनंद मिळू शकेल.

या वेळी बोलताना स्मृती यांनी अमेठीचे माजी खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. त्या म्हणाल्या २००४ पासून राहुल गांधी या मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यापूर्वी १९९९ मध्ये सोनिया गांधी यांना येथील जनतेने खासदार निवडून दिले होते मात्र गांधी कुटुंबीयांनी येथे कधीही घर बांधण्याचा विचार केला नाही. ते पाहुण्याप्रमाणे अतिथीगृहात राहिले. अमेठीच्या लोकांना खात्री पटली होती कि, राहुल एकदा निवडून गेले कि पाच वर्षे बेपत्ता होतात, हातात दिवा घेऊन त्यांना दिल्लीत शोधावे लागते.

या वेळी स्मृती यांनी अनेक विकास कामांची घोषणा केली. आमदार मयंकेश्वर शरण सिंग यांनी स्मृती पुढील निवडणुकीच्या वेळी येथून नुसत्या उमेदवार नसतील तर मतदारही असतील असे जाहीर केले. स्मृती यांनी बोलताना अमेठीची जनता एका सामान्य कुटुंबातून आलेल्या महिलेला त्यांची प्रतिनिधी म्हणून निवडून देईल असा कधी विचारही केला नव्हता असे सांगितले. त्या म्हणाल्या अमेठीने मला खासदार नाही तर दीदी बनविले आहे आणि हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.

यावेळी स्मृती यांनी ३०.२७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सहा रस्त्यांचे लोकार्पण केले तसेच अन्य एका रस्त्याचे भूमिपूजन केले. त्याचबरोबर त्यांनी २११७ गरीब परिवारांना पंतप्रधान आवास योजनेतून बांधल्या गेलेल्या घरांच्या किल्ल्या सुपूर्द केल्या तसेच २३०२ जणांना आयुष्मान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गोल्डन कार्ड्सचे वितरण केले.

Leave a Comment