200 कोटींच्या या लग्नात देश-विदेशातील व्यावसायिकांसह सेलेब्रिटींची उपस्थिती


नवी दिल्ली – सध्याच्या घडीला उत्तराखंडच्या औलीतील शाही विवाह चर्चेचा विषय बनला असून भारतीय मुळचे दक्षिण आफ्रिकाचे उद्योगपती गुप्ता बंधूंच्या मुलांचा विवाह सोहळ्याला येथे सुरुवात झाली आहे. तब्बल 200 कोटी रूपये खर्च करण्यात आलेल्या या लग्नात पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 5 कोटी रूपयांच्या परदेशी फुलांनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी औलीला सजवण्यात आले आहे. त्याचबरोबर लग्नासाठी चित्रपटांचे सेट उभारण्यात आले आहेत. तसेच या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसाठी 5 किलो चांदी वापरण्यात आली आहे. औली आणि बद्रीनाथाचे फोटो देखील याच्या पानांवर लावले आहेत.

हा विवाह सोहळा औलीच्या हॉटेल क्लिपमध्ये पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यास अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडीस, कॅटरिना कॅफ, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहिद कपूर यांसारखे कलाकार उपस्थिती दर्शवणार असल्याचे गुप्ता कुटुंबातील लोकांनी सांगितले. 100 ब्राह्मण गुप्ता बंधुंच्या दोन्ही मुलांचे लग्न पार पाडणार आहे. अवधेशानंद महाराज यामध्ये मुख्य पुजारी असतील. कथा वाचक रमेश भाई ओझा देखील याशिवाय आपली उपस्थिती लावणार आहेत. या विवाह समारंभात बॉलीवूडचे कलाकार येणार असुन ते याठिकाणी सादरीकरण देखील करणार आहेत.

सध्या गुप्ता बंधुंच्या मुलांच्या विवाह समारंभाच्या तयारीमुळे समुद्रसपाटीपासून 9500 ते 10500 फूट उंचीवर स्थित विश्व प्रसिद्ध हिम क्रीडा केंद्र ओली चर्चेचा विषय ठरले आहे. उद्योगपती अजय गुप्ता यांचे चिरंजीव सूर्यकांतचा विवाह दिल्लीचे हिरा व्यापारी सुरेश सिंघल यांची मुलगी कृतिका तर अतुल गुप्ताचे चिरंजीव शशांकचा विवाह दुबईचे रिअल स्टेट व्यावसायिक विशाल जलान यांची मुलगी शिवांगीसोबत होणार आहे. सूर्यकांतचा विवाह 20 जून रोजी पार पडला तर शशांकचा विवाह 22 जून रोजी पार पडणार आहे. सोमवार पासून विवाह समारंभाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

गुप्ता बंधुंनुसार त्यांना आपल्या मुलांचे लग्न इटलीमध्ये करायचे होते. पण उत्तराखंडला वेडिंग डेस्टिनेशन बनवण्याचा राज्य सरकारच्या उद्देश पाहता त्यांना यासाठी औलीची निवड केली. गुप्ता परिवाराने स्थानिक गावांतील सर्व लोकांना लग्नाचे आमंत्रण दिले आहे. यासाठी तेथेही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सर्व पाहुण्यांना बद्रीनाथाचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

Leave a Comment