ठरले तर मग… हि अभिनेत्री झळकणार लाल सिंह चड्ढामध्ये


काही महिन्यांपूर्वी म्हणजेच त्याच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर अभिनेता आमिर खान याने लाल सिंह चड्ढा या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट रिमेक असणार आहे. जगभरातील प्रेक्षकांनी १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते.

आमिर लाल सिंह चड्ढा या चित्रपटात सरदारजीच्या भूमिकेत दिसणार असून तो तब्बल २० किलो वजन या चित्रपटासाठी कमी करणार आहे. ‘फॉरेस्ट गम्प’ चे हक्क आमिरच्या प्रोडक्शन हाऊसने विकत घेतले असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी या चित्रपटाचे लेखन करत आहे.

कित्येक महिने आमिरच्या लाल सिंह लड्ढा या चित्रपटाची घोषणा होऊन झाले असले तरी या चित्रपटात नायिका कोण असणार यावर या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले होते. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, करिना कपूर आमिरच्या नायिकेच्या भूमिकेत या चित्रपटात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच चित्रपटाच्या टीमकडून करिनाच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

अद्वैत चंदन ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट अद्वैतने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. तसेच या चित्रपटाने अनेक पुरस्कार देखील मिळवले होते.

Leave a Comment