सोशल मीडियात व्हायरल झाले जिओ गिगाफायबरचे प्लॅन


रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात एंट्री केल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्याचे धाबे दणाणले होते. आता त्यातच रिलायन्सने गीगा फायबरची घोषणा केल्यानंतर अनेकजण त्याची लाँच होण्याची वाट बघत आहेत. रिलायन्स जिओने काही प्रमुख शहरांमध्ये याची चाचणीही सुरू केली आहे. यादरम्यान, ग्राहकांना कमर्शिअल लाँचनंतरच देण्यात येणाऱ्या सुविधा पुरवण्यात येत आहेत. यामध्ये फायबर ऑप्टीकचा वापर करण्यात आल्याने याद्वारे उत्तम इंटरनेट स्पीडही मिळणार आहे.

जिओ गिगाफायबरबाबत अनेक बाबी आतापर्यंत लिक झाल्याचे समोर आले होते. पण अद्याप याची किंमत किती असेल आणि काय प्लॅन असतील याबाबत मात्र माहिती समोर आली नव्हती. त्यातच आता पुन्हा एक माहिती प्लॅनबाबत समोर आली आहे. यानुसार 600 रूपये प्रति महिना गिगाफायबरचा सुरूवातीचा प्लॅन असणार आहे. युझरला यामध्ये 50Mbps चा स्पीड मिळणार आहे. तर 100Mbps स्पीडच्या प्लॅनसाठी प्रीव्ह्यू सब्सक्रायबर्सना महिन्याला 1 हजार रूपये मोजावे लागणार आहेत.

भारतीय ग्राहकांमध्ये जिओ गिगाफायबर बाबत मोठे आकर्षण आहे. भारतीय बाजारपेठेतील जिओच्या आगमनानंतर ग्राहकांना कमी किंमतीत इंटरनेट सेवा आणि कॉलिंग सेवा मिळण्यास सुरूवात झाली आहे. अशातच जिओची ही नवी सेवा इतर ब्रॉडबँडच्या तुलनेत स्वस्तच असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, जिओकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया लिक झालेल्या किंमतीबाबत देण्यात आली नाही. याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये कंपनीच्या बैठकीत होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिओने गेल्या काही महिन्यांपासून 100Mbps स्पीडची प्रिव्ह्यू ऑफर देण्यास सुरूवात केली होती. ग्राहकांना यामध्ये 4 हजार 500 रूपयांचे सिक्यॉरिटी डिपॉझिट देणे बंधनकारक होते. तसेच ग्राहकाने कनेक्शन बंद केल्यास हे सिक्यॉरिटी डिपॉझिट परत करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा देण्यात येत आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment