राजकारणात साधू-संन्यासांचे काय काम? – भाजप आमदार


सांगली – साधू-महाराजांवर जोरदार टीका करीत भाजप सरकारचे आमदार विलास जगताप यांनी वाभाडे काढले. त्यांनी जत येथील एका जाहिरसभेत बोलताना यावेळी साधू-संन्यासी, महाराज हे बदमाश आहेत. त्यांचे राजकारणात काय काम आहे? असा सवाल उपस्थित केला.

साधू-संन्यासी आणि महाराजांना भाजपमध्ये सर्वोच्च स्थान देण्यात येत आहे. भाजपकडून साधू-संन्याश्यांना निवडणुकीत उमेदवारीपासून मंत्री पदापर्यंत मान देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी सोलापूरचे नवनिर्वाचित भाजप खासदार जयसिद्धेशवर स्वामी यांच्यावरही निशाणा साधला. तसेच इंदुरीकर महाराज, बाबा महाराज सातारकर सारख्या अन्य कीर्तनकारांनी ज्ञानेश्वरी वाचन, कीर्तन करण्याचा बाजार मांडला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची बाबा पुरंदरेंनी बदनामी केली. सरकारकडून त्याच पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्यामुळे कुठल्या दिशेने हे सरकार निघाले असल्याचा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

चांगल्या गुणांना राजकारणात वाव राहिलेला नाही. भाजपचे सिद्धेश्वर स्वामी सोलापूर मतदारसंघातून निवडून आले आहे. राजकारणात त्यांचे काय काम आहे. तसेच राजकारणात हे स्वामी लोक का येत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एवढेच नाहीतर सोलापूर मतदारसंघात पराभूत झालेले काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

भगवे वस्त्र परिधान करणे म्हणजे ज्यांनी लोभ, मोह, क्रोध यांच्यावर विजय मिळवला आहे. पण भगवे वस्त्र आज परिधान करतात आणि खासदारकीला उभे राहतात. स्वामी-महाराजांनी आपले काम करायला पाहीजे. राजकारणात त्यांनी येऊ नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. विशेष म्हणजे भाजप पक्षाचे आमदार असून पक्षाशी बांधील असल्याचेही आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment