मुंबई – भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेसाठी अद्याप कुठल्याही पक्षाशी संपर्क साधलेला नसून वंचितची २८८ जागांसाठी तयारी असून त्यासाठीची पहिली यादी ३० जुलैला जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीला राज्यात दोन अंकी जागा मिळणार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
विधानसभेच्या सर्वच जागा लढवणार वंचित बहुजन आघाडी
भाजपने नव्हे तर ईव्हीएमने वंचित बहुजन आघाडीला हरवले असल्यामुळे १५ तारखेची वेळ निवडणूक आयोगाला मागितली आहे. ईव्हीएम घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मतांमध्ये फरक असलेल्या ठिकाणी न्यायालयात धाव घेणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात देखील पक्षाकडून जाणार आहे. यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वच पक्ष यामध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडी भाजपची बी-टीम असल्याचे आरोप काँग्रेस बैठकीत झाले होते. पण बी टीम असल्याचे पुरावे त्यांनी द्यावे. नाहीतर ४० लाख मतदारांची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे.