‘हॉटस्टार’ भारतातील सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म ठरला आहे.


एका सर्वेक्षणात ‘हॉटस्टार’ हा भारतातील सध्याचा सर्वात लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ‘काउंटरपॉइंट रिसर्च’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार हॉटस्टारला भारतातील लोकांची सर्वाधिक पसंती असून त्यानंतर या यादीत अॅमेझॉन प्राइम आणि सोनी लिव्हचा क्रमांक येतो. सर्वाधिक लोकप्रिय असूनही देशातील मोठ्या शहरांमध्ये नेटफ्लिक्सचा क्रमवारीत चौथा क्रमांक आहे. भारतातील टॉप 5 मेट्रो शहरातील युजर्सपैकी 65 टक्के लोक नेटफ्लिक्स वापरत असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.

हॉटस्टारची लोकप्रियता क्रिकेट मॅचेसच्या स्ट्रिमिंगमुळे सर्वाधिक असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मेट्रो शहरातील हॉटस्टारचे 56 टक्के युजर्स असल्याचे देखील यात म्हटले आहे. भले हॉटस्टारवरील कंटेंटसाठी पैसे द्यावे लागत असले तरी ठराविक कंटेंट पैसे न भरता पाहण्याचीही सोयदेखील या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हॉटस्टारकडे अशा प्रकारे कंटेंट पाहणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

‘काउंटरपॉइंट रिसर्च’च्या या सर्वेक्षणानुसार स्मार्ट टिव्हीवर कंटेंट पाहणाऱ्यांमध्ये ‘इरॉस नाऊ’चे प्रमाण सर्वाधिक आहे. स्मार्ट टिव्हीवर कंटेंट पाहणे इरॉस नाऊचे जवळपास 27 टक्के युजर्स पसंत करतात. ‘रिलायन्स जिओ’ हे भारतातील ओटीटी युजर्ससाठी सर्वात लोकप्रिय मोबाईल नेटवर्क असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. जिओनंतर एअरटेल आणि वोडाफोन-आयडीयाचा क्रमांक लागतो. तसेच भारतातील ओटीटी युजर्सपैकी 90 टक्के युजर्स 35 वर्षापेक्षा कमी वयाचे असल्याचे देखील या सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे.

Leave a Comment