
मुंबई – आरजे मलिष्काने मागच्याच वर्षी मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांवरून ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’ या गाण्याच्या माध्यमातून बृहन्मंबई महानगरपालिकेचे वाभाडे काढले होते. त्यानंतर ती पलिकेचे अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाच्या टीकेची धनी ठरली होती. तिच्यावर अनेक माध्यमांतून टीका करण्यात आली होती. काही नगरसेवकांनी तर तिच्या गाण्याचे विडंबन करत तिचीच खिल्ली उडवली होती.
आरजे मलिष्कासमोर मुंबई महापालिकेची शरणागती
त्यातच काही दिवसांपूर्वी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यंदा देखील मुंबापुरीची तुंबापुरी होऊ शकते, असे म्हटले होते. त्याच पार्श्वभूमिवर पावसासोबतच मलिष्का देखील पुन्हा बरसू शकते. म्हणूनच पालिकेने ‘रेड एफएम 93.5’ फेम आरजे मलिष्का व त्यांच्या सहकाऱ्यांनाच मुंबईकरांपर्यत त्यांची काम पोहोचवण्यासाठी निमंत्रित केले होते.

मुंबईतील खड्डे व इतर नागरी समस्यांवरून यंदा पुन्हा पावसाळ्यात पालिकेला टीकेची धनी होण्यापासून वाचण्यासाठी मलिष्कापुढे पालिका आयुक्तांनी शरणागती पत्कारली आहे. आरजे मलिष्का व त्यांचे सहकारी तसेच मराठी सिने अभिनेते अजिंक्य देव यांना सोबत घेऊन पालिका आयुक्तांनी वरळी येथील महापालिकेच्या लव्हाग्रोव्ह पंपीग स्टेशनला तसेच महापालिका मुख्यालयातील आपतकालीन नियंत्रण कक्षाची ओळख करून दिली.
मुंबईतील रस्त्यावर यंदा पावसाळ्यात खड्डे न पडण्याचा व पाणी न तुंबण्याचा निर्धार पालिका आयुक्तांनी केला असून कोणत्या उपाययोजना त्याकरीता केल्या, याबाबत आयुक्तांनी मलिष्काला माहिती दिली. मलिष्काने या पाहणी भेटीनंतर पालिकेसमोर लोटांगण घातले का ?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबईकरांना विविध नागरी सेवा सुविधा दर्जेदारपणे पुरविण्यासाठी बृहनमुंबई महानगरपालिका अहोरात्र प्रयत्न करीत असते. पण मुंबईकरांना त्या कामांचे प्रतिबिंब दिसण्यासाठी प्रसार माध्यमे – सोशल मिडिया ही महत्वपूर्ण भूमिका बजावितात म्हणून त्यांनी अशी सर्व नागरी सेवा सुविधांची कामे मुंबईकर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यावेळी केले.
