कॅलिफोर्नियात गस्ती रोबो पोलीस तैनात


कॅलिफोर्निया पोलिसांनी गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळावे यासाठी रोबो पोलीस रस्त्यांवर तैनात केले असून हे पोलीस सार्वजनिक ठिकाणी पाळत ठेवणार आहेत. हे एक प्रकारचे स्टाईल मशीन असून त्याला एचपी रोबो कॉप असे नाव दिले गेले आहे. ते रस्ते, बागबगीचे, मॉल, वेअरहाउस, अश्या सर्वठिकाणी देखरेख करणार आहेत.

लॉस एंजेलिसच्या दक्षिणेला १० किलोमीटरवर असलेल्या ५० हजार लोकवस्तीच्या शहरांवर हे रोबोकॉप नजर ठेवणार आहेत. हंटिंगटन पार्क पोलिसांनी असे रोबो या आठवड्यात शहरात तैनात केल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे. त्यानुसार हे एकप्रकारचे ऑटोनॉमस डेटा मशीन असून त्याला ३६० अंशात फिरणारा व्हिडीओ कॅमेरा दिला गेला आहे. या कॅमेऱ्यातून रोबो, पोलीस मुख्यालयाकडे डेटा आणि व्हिडीओ फुटेज पाठवितात. यामुळे पोलिसांना सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत बनविण्यास मदत मिळत आहे.


सिलीकोन व्हॅलीतील नाईटस्कोप या कंपनीने हे रोबो तयार केले आहेत. कॅलिफोर्नियातील प्रयोग यशस्वी झाला तर अमेरिकेच्या निवडक शहरातील मॉल्स, हॉस्पिटल्स, स्टेडीयम मध्येही ते तैनात केले जाणार आहेत. जेथे पोलीस सतत गस्त घालू शकत नाहीत अथवा पाळत ठेऊ शकत नाहीत अश्या जागी हे रोबो उपयुक्त ठरणार आहेत असे सांगितले जात आहे.

हे रोबो कॉप केवळ लोकांवर पाळत ठेवण्याचे काम करतात असे नाही तर त्यांच्याशी एक्स्क्युज मी किंवा गुड डे असे बोलून संभाषण करतात. चोऱ्या, लुटालूट, मारहाण अश्या घटनांना या रोबो कॉपमुळे लगाम घालता येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

या रोबोना ३६० अंशात फिरणारा कॅमेरा, वायफाय, सेन्सिंग युनिट्स आहेत व त्यांच्या सहाय्याने हे रोबो लाइव व्हिडीओ स्ट्रीमिंग, लायसन्स प्लेट वाचणे, लोकांना ओळखण्यात सक्षम बनविले गेले आहेत. हे रोबो गुन्हेगार कोण आहे आणि कोण नाही हेही सहज ओळखू शकतात असा दावा केला जात आहे. पोलिसांसाठी हे रोबोकॉप म्हणजे तिसरा डोळा असतील असे सांगितले जात आहे.

Leave a Comment