बहुतांश पक्षांकडून ‘एक देश, एक निवडणूक’चे समर्थन


नवी दिल्ली – बहुतांश पक्षाच्या प्रमुखांनी ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेला पाठिंबा दिला असून याबाबत सीपीआयचे वेगळे मत आहे. पण याला त्यांनी विरोध केलेला नसल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी यासंदर्भात सल्लागार समिती स्थापन करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीला लोकसभा किंवा राज्यसभेत किमान एक खासदार असलेल्या पक्षाच्या प्रमुखांना मोदींनी एकत्रित निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलावले होते. यासाठी एकूण ४० पक्षांना निमंत्रण देण्यात आले होते. यातील २१ पक्षांचे अध्यक्ष बैठकीला हजर राहिले. तर, तिघांनी आपले विचार लिखित स्वरूपात पाठवले. संपुआतील काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सीपीएमचे सीताराम येचुरी, सीपीआयचे डी. राजा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक उपस्थित होते. पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला या बैठकीला उपस्थित होते.

तर या बैठकीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती, डीएमकेचे एमके स्टॅलिन, टीडीपीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठ फिरवली. ईव्हीएम मशीनबद्दल बैठक असती, तर मी सर्वपक्षीय बैठकीला हजर राहिले असते, असे टि्वट मायावती यांनी केले होते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.

Leave a Comment