असा आहे इतिहास ‘योगा मॅट’चा.


२०१६ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाच्या अनुसार एकट्या अमेरिकेमध्ये ३६.७ मिलियन लोक नियमित योगाभ्यास करतात. २०१२ साली योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या २०.४ मिलियन होती, पण गेल्या चार वर्षांमध्ये या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे या सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे. योगाभ्यासासाठी आवश्यक वस्तूंच्या ‘योग बाजाराची’ उलाढाल केवळ अमेरिकेमध्ये सोळा बिलियन डॉलर्स, तर जागतिक पातळीवर ही उलाढाल ऐंशी मिलियन डॉलर्सच्या घरात आहे. या योग बाजारामध्ये ‘योगा मॅट’ ही सर्वाधिक मागणी असलेली वस्तू असल्याचेही या सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे. मात्र भारतामध्ये योगसाधनेची परंपरा प्राचीन काळापासून अस्तित्वात असताना हठयोगी अशा प्रकारच्या मॅट वापरत असल्याचे कधीही ऐकिवात नव्हते. त्यामुळे आजच्या काळामध्ये योगाभ्यास करण्यासाठी अनिवार्य असलेल्या या योगा मॅट्स अस्तित्वात आल्या कशा हे जाणून घेणे खरेच रोचक ठरेल.

१९७०च्या दशकापर्यंत योगाभ्यासासाठी सतरंजी किंवा चटईचा वापर केला जाणे सामान्य होते. पण आताच्या काळामध्ये या सतरंजी किंवा चटईची जागा आता रबरच्या योगा मॅट्ने घेतली आहे. या रबरी मॅट वापरण्याचा विचार अस्तित्वात आला कसा ? तर या प्रकारच्या मॅट्स वापरण्याची कल्पना सर्वप्रथम योगगुरु बीकेएस अय्यंगार यांनी प्रत्यक्षात आणली. सुरुवातीला योगगुरु अय्यंगार स्वतः देखील इतर योगाभ्यासकांच्या प्रमाणे जमिनीवर सतरंजी अंथरून योगाभ्यास करीत असत. १९६०च्या दशकामध्ये जेव्हा योगगुरु अय्यंगार यांनी युरोपमधील लोकांना योगाभ्यास शिकविण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या विद्यार्थ्यांना उभे राहून करावयाची आसने करताना अडचण होत असून त्यांचे पाय सतत घसरत असल्याचे योगगुरू अय्यंगारांच्या लक्षात आले. सतत पाय घसरत असल्याने आसनावर लक्ष केंद्रित असण्याच्या ऐवजी हे विद्यार्थी, आसने करताना आपला तोल तर जाणार नाही याचीच काळजी अधिक करीत असत. त्यामुळे योगाभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अवघड होत असे.

भारतातील योगाभ्यासकांना मात्र उभे राहून आसने करताना कधीच अडचण होत नसे, कारण त्याकाळी बहुतेक घरांमध्ये आणि विशेषतः गुरुजींच्या योगाभ्यास केंद्रामध्ये कडप्पा नामक फरशी घातली असल्याने गुळगुळीत फरशीवर तोल जाऊन पडण्याचा धोका भारतीय विद्यार्थांच्या बाबतीत कधीच उद्भवत नसे. एकदा जर्मनीला गेलेले असताना गालिच्याच्या खाली अंथरलेली हिरव्या रंगाची रबरी चटई गुरुजींनी पहिली. गालीचा सरकून कोणी पडू नये, किंवा कोणाचा पाय घसरू नये यासाठी ही रबरी चटई अंथरली असल्याचे गुरुजींना समजताच आपल्या युरोपियन विद्यार्थांसाठी देखील ही रबरी चटई योगाभ्यासाच्या कामी येईल असा विचार गुरुजींच्या मनामध्ये आला. तेव्हा गुरुजींनी आधी स्वतः या चटईचा उपयोग योगाभ्यासासाठी करून पाहिला. तेव्हा या चटईवर योगासने करीत असताना पाय अजिबात घसरत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा प्रकारे योगा मॅटचा जन्म झाला.

योगगुरु अय्यंगार यांनी या चटईला ‘स्टिकी मॅट’ असे नाव दिले, कारण एकदा ही चटई जमिनीवर अंथरली, की ती जागची अजिबात सरकत नसून, चिकटविल्याप्रमाणे एका ठिकाणी रहात असे. हळू हळू या ‘स्टिकी मॅट’ आधी जर्मनी मध्ये आणि तिथून पुढे ब्रिटनमध्ये लोकप्रिय होऊ लागल्या. खास योगाभ्यासासाठी निळ्या रंगांच्या स्टिकी मॅट्सचे उत्पादन जर्मनीमध्ये सुरु झाले. हळू हळू ही मॅट विदेशांमध्ये लोकप्रिय होऊ लागली. भारतामध्ये मात्र त्या काळी या मॅट्स उपलब्ध नव्हत्या आणि त्यांची येथे म्हणावी तशी आवश्यकता ही नव्हती. मात्र विदेशी योगाभ्यासक भारतामध्ये येत असताना या मॅट्स आपल्यासोबत घेऊन येत असत, आणि त्या इथेच ठेऊन जात असत, त्यामुळे कालांतराने योगाभ्यास केंद्रांमध्ये अशा रबरी मॅट्स पहावयास मिळू लागल्या.

गेल्या काही वर्षांपासून या मॅट्स आता जगभरात सर्वत्र उपलब्ध असून, जर्मनी, अमेरिका आणि आता चीन या मॅट्चे प्रमुख उत्पादक आहेत. आता या योगा मॅट्स, ‘नाइकी’ आणि ‘रिबॉक’ सारख्या प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँड्सच्या मार्फतही जगभरामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आजच्या काळामध्ये योगा मॅटच्या उत्पादन व्यवसायाची किंमत एक बिलियन डॉलर्सच्या घरात जाऊन पोहोचली आहे. या मॅटची कल्पना योगगुरु अय्यंगार यांची असली, तरी आजवर भारतामध्ये मात्र या मॅट्सचे उत्पादन अजूनही सुरु झालेले नाही, ही विशेष गोष्ट आहे.

Leave a Comment