बिचुकलेला बिग बॉसच्या घरातून हाकलण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे


मुंबई – भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे बिग बॉस मराठीच्या घरातून अभिजित बिचुकले यांना हाकला अशी मागणी केली आहे. सहकलाकार रूपाली भोसले हिच्या घटस्फोटाचा उल्लेख करत अभिजित बिचुकलेंनी तिच्या चारित्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा रितू तावडे यांनी केला आहे. एकल पालक महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त्या यांचा बिचुकले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अपमान होत असल्याचा आरोपही रितू तावडे यांनी केला असून बिचुकलेंची हकालपट्टी करण्याची मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

त्याचबरोबर रितू तावडे यांनी अभिजित बिचुकले आणि संबंधित वाहिनीवर कारवाई केली नाही तर आपण आंदोलन करू असाही इशारा दिला आहे. रूपाली भोसले आणि बिचुकले यांची बिग बॉस मराठीच्या २४ व्या भागात वादावादी झाली. बिचुकले यांनी रूपाली भोसलेवर त्यावेळी अत्यंत हिन शब्दात शेरेबाजी केली. आता भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे याच सगळ्या प्रकारावरून आक्रमक झाल्या आहेत. महिलांचा बिचुकलेंनी अपमान केला आहे त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Comment