हार्ड कौरविरुद्ध वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


मुंबई – सोशल मीडियावर सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट लिहिल्या प्रकरणी प्रसिद्ध गायिका हार्ड कौरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्यनाथ यांचा फोटो शेअर करत त्यांना बलात्कारी आणि संघप्रमुख मोहन भागवत यांना सध्या यूकेमध्ये राहणारी पंजाबी गायिका कौरने दहशतवादी म्हटले होते.

आता या प्रकरणी वकील शशांक शेखर त्रिपाठी यांच्या लेखी तक्रारीनंतर वाराणसी पोलीस ठाण्यात हार्ड कौरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोंदवलेल्या तक्रारीनुसार सामान्य जनमानसाच्या भावना या पोस्टमुळे दुखावल्या गेल्या आहेत. शशांक यांच्या तक्रारीवर कॅन्ट पोलिसांनी कलम १५३ ए, १२४ ए, ५००, ५०५ आणि ६६ आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मोहन भागवत यांना हार्ड कौरने फक्त जातीयवादी म्हटले नाही तर भारतात आतापर्यंत २६/११, पुलवामा यांसारखे जेवढे हल्ले झाले त्याला संघ जबाबदार असल्याचे म्हटले. कौरने याआधीही वेगवेगळ्या सेलिब्रिटी, राजकीय नेते यांच्यावर टीका केल्या आहेत. पण आता योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत यांच्यावर टीका करणे तिला चांगलेच महाग पडले आहे. तिला सोशल मीडियात फैलावर घेतले जात असून अनेकजण तिची शाळा घेत आहेत.

Leave a Comment