‘यूट्यूब’ने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवले ९० लाख व्हिडिओ


वॉशिंग्टन : धोकादायक किंवा द्वेष पसरवणारे व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे काम ‘गूगल’चे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म ‘यूट्यूब’कडून सुरू आहे. असे तब्बल ९० लाखांहून अधिक व्हिडिओ गेल्या तीन महिन्यांमध्ये यूट्यूबवरून हटवण्यात आले आहेत. ही माहिती नुकतीच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी दिली. हे व्हिडीओ समाजासाठी घातक असून तसे व्हिडिओ पसरवण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. पिचाई यांनी ही बाब सीएनएनच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केली.

भारतात यूट्यूबच्या वापरकर्त्यांपैंकी जवळपास ८५ टक्के लोक मोबाईलवर व्हिडिओ पाहतात. हाच आकडा गेल्या वर्षी ७३ टक्क्यांवर होता. जानेवारी २०१९ च्या आकड्यांनुसार, देशात यूट्यूबच्या मासिक सक्रीय उपभोक्त्यांची संख्या २६.५ करोडोंच्या पार गेली आहे. ही संख्या गेल्या वर्षी २२.५ कोटी होती. भारतात यूट्यूबला प्रवेश करून आता ११ वर्ष पूर्ण होतील .

आमचा सर्वात मोठा दर्शक वर्ग २६.५ करोड मासिक सक्रिय उपभोक्त्यांच्या संख्येनिशी भारतात असल्याचे ‘यूट्यूब’च्या वैश्विक मुख्य कार्यकारी सुझान वोजसिकी यांनी म्हटले होते. त्या यूट्यूबच्या वार्षिक कार्यक्रम ‘ब्रॉ़डकास्ट इंडिया’ला संबोधित करताना बोलत होत्या. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारांपैंकी एक आहे.

वोजसिकी यांच्या म्हणण्यानुसार, मोबाईलवर यूट्यूब पाहणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षी वेगाने वाढली असून १२०० भारतीय यूट्यूब चॅनल असेही आहेत ज्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या १० लाखांहून अधिक आहे. हीच संख्या पाच वर्षांपूर्वी केवळ दोनवर होती.

Leave a Comment