लिब्रा नावाने फेसबुकची क्रिप्टोकरन्सी सादर


सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने त्यांची क्रिप्टोकरन्सी लिब्रा नावाने सादर केली असून तिचे संचालन करण्यासठी कॅलीबरा नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या क्रिप्टोकरन्सीचे ग्लोबल लाँचिंग पुढच्या वर्षी केले जाणार आहे आणि त्यानंतर व्हॉटस अप आणि मेसेंजरच्या माध्यमातून लिब्रा पेमेंट करता येणार आहे असे समजते.

फेसबुकने या संदर्भात एक डिजिटल वॉलेट सादर केले आहे. त्यात लिब्राच्या देवघेवीचे रेकोर्ड ठेवता येणार आहे. फेसबुकच्या म्हणण्यानुसार लीब्राच्या माध्यमातून पेमेंट करणे हे एखादा मेसेज पाठविण्याइतके सोपे सहज आहे. अर्थात भारतासह अन्य अनेक देशात ही योजना लागू करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे कारण भारताने क्रिप्टोकरन्सी विरोधात कडक पाउले उचललेली आहेत.


फेसबुक व्यवस्थापनाने जाहीर केल्यानुसार कॅलीबरा ही त्यांची नवी उपकंपनी आहे. लोकांना वित्त सेवा देणे हे तिचे काम आहे आणि युजर्सना त्या माध्यमातून लिब्रा नेटवर्क अॅक्सेस मिळणार आहे. ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित ग्लोबल करन्सी असून त्यासाठी व्हॉटस अप आणि मेसेंजर शिवाय एक वेगळे अॅप लाँच केले जात आहे. फेसबुकच्या सांगण्यानुसार जगातील ज्या १७० कोटी वयस्क लोकांचे बँक अकौंट नाही ते लिब्राचा वापर करून खरेदी करू शकतील. त्यासाठी स्कॅन कोड दिला जाईल. युजरच्या अकौंट सुरक्षेसाठी अँटी फ्रॉड व्हेरीफीकेशनचा वापर केला जाणार आहे.

विशेष म्हणजे काही विशेष बाबी वगळता युजरच्या परवानगीशिवाय त्यांच्या अकौंटची माहिती अथवा डेटा थर्ड पार्टीला दिला जाणार नाही तसेच त्याचा जाहिरातीसाठी वापर केला जाणार नाही असे फेसबुकने जाहीर केले आहे.

Leave a Comment