मुंबईतून जप्त केली एक कोटी 70 लाख रुपये किमतीची देवमाशाची उलटी


मुंबई – नागपूरहून मुंबईत तब्बल एक कोटी 70 लाख रुपये किमतीची देवमाशाची उलटी विकायला आलेल्या एकाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर याच गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीला गुजरातधून अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून उलटीपासून तयार झालेला किमती दगड जप्त करण्यात आला.

एक इसम देवमाशाची उलटी विकण्यासाठी विद्याविहार कामा लेन येथे येणार असल्याची खबर घाटकोपर पोलिसांना मिळाली. प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर, एपीआय दीप बने, उपनिरीक्षक मैत्रानंद खंदारे, तसेच अशोक भोसले, पाटील, चव्हाण, पवार, अमोल दरेकर, वाघ, परबळकर, जगधने, ठाकरे, परब आदींच्या पथकाने त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कामा लेन येथे राहुल दुपारे हा इसम येताच त्याच्यावर पोलिसांनी झडप घातली. त्याची झडती घेतली असता एक किलो 130 ग्रॅम वजनाची देवमाशाची उलटी सापडली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची एक कोटी 70 लाख एवढी किंमत आहे. त्याने ही उलटी गुजरातमधील ललित व्यास याच्याकडून घेतल्याचे चौकशीत सांगितले. मग पोलिसांनी गुजरात गाठून व्यासच्या मुसक्या आवळल्या. अत्तर तसेच सुगंधी द्रवपदार्थ बनविण्यासाठी देवमाशाच्या उलटीचा वापर होतो.

देवमाशाच्या उलटीपासून बनलेल्या दगडाचा जर घरात धूप म्हणून वापर केला तर त्यापासून घरातील वातावरण सुगंधी होते. तसेच घरात भरभराट होते, असे बोलले जाते. त्यामुळे देवमाशाच्या उलटीला मागणी असून त्याची किंमत प्रचंड महाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment