भाजपशी युती असली तरी आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच – उद्धव ठाकरे


मुंबई – शिवसेना पक्षस्थापनेला १९ जून २०१९ ला ५३ वर्ष पूर्ण झाली असून पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून त्यानिमित्ताने जरी भाजपशी ‘युती’ असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असल्यामुळे आगामी विधानसभा ‘भगवी’ करून शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

शिवसेनेचा चळवळ हाच आत्मा असून जशा मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, हिंदूंचा स्वाभिमान यासाठी या चळवळी झाल्या त्यापेक्षा या चळवळी जनतेच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांवर अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले. महागाईविरोधात लाटणे मोर्चे, पाण्यासाठी हंडा मोर्चे, गहू-तांदूळ, तेलासाठी सुरुवातीच्या काळात आंदोलने झाली. आता ती आंदोलने शेतकऱ्याच्या प्रश्नांवर होत आहेत. पण त्याच्या जोडीने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी पाणीवाटप, चारा छावण्या, अन्नछत्रापर्यंत हे समाजकार्य पोहोचल्याचेही ते म्हणाले.

शेंडी-जानव्याचे आणि देवळातल्या घंटा बडवण्यापुरते शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व हे नव्हते. सर्वसमावेशक अशी त्यांची भूमिका होती. राष्ट्रद्रोही, मग ते कोणत्याही धर्माचे असतील या देशात त्यांना थारा नाही हे त्यांचे हिंदुत्व. राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिमेची अंत्ययात्रा काढणाऱ्या आणि समान नागरी कायद्याची होळी करणाऱ्या जात्यंधांना या देशात थारा नाही, असे खणखणीतपणे सांगणारे, परिणामांची पर्वा न करता ही भूमिका पुढे नेणारे एकमेव हिंदुहृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे असल्याचे यावेळी मांडण्यात आले आहे.

शिवसेना आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे; पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. शिवसेना एका निर्धाराने पुढे निघाली आहे. आम्ही याच निर्धाराने शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान करू, असे म्हणत एकप्रकारे भाजपला इशारा देण्याचे काम करण्यात आले आहे.

Leave a Comment