रिलीज आधीच राजामौलींच्या आगामी चित्रपटाची 70 कोटींची कमाई


रिलीज होण्याच्या आधीच दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित ‘आरआरआर’ या चित्रपटाने एक विक्रम नोंदवला आहे. या चित्रपटाने रिलीजआधीच परदेशातील थिएटर राई्टसह आतापर्यंत तब्बल 70 कोटींची कमाई केली आहे. अद्याप या चित्रपटाचे शूटिंग संपलेले नसतानाही फक्त हक्क विकून या चित्रपटाने केलेल्या कमाईने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राजामौलींनी परदेशातील फिल्म डिस्ट्रीब्युशन हाऊस ‘फार्स फिल्म्स’ सोबत मोठा करार केला आहे.

राजामौलींच्या बाहुबली सिरीजला मिळालेल्या भरघोस यशानंतर आगामी चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यामुळे ‘आरआरआर’ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेता रामचरण आणि ज्यूनियर एनटीआर यांची प्रमुख भूमिका आहे. जवळपास 300 कोटीचे या चित्रपटाचे बजेट आहे. या चित्रपटात आलिया भट महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

आलियाचा ‘आरआरआर’ पहिला दाक्षिणात्य चित्रपट असणार आहे. त्याचबरोबर अजय देवगणही या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा काल्पनिक असून 1920 मधील स्वातंत्र्यसैनिक अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन पात्रांभोवती असणार आहे. बाहुबलीपेक्षा मोठ्या स्केलवर करण्याच्या राजामौली तयारीत आहेत. हा चित्रपट 30 जुलै 2020 रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment