अमेरिकेतील बाहुबली शेफ, आंद्रे रश


महासत्ता अमेरिकेतील अध्यक्ष निवासस्थान व्हाईटहाउसच्या भटारखान्यातील काही फोटो सध्या सोशल मिडीवर व्हायरल झाले असून त्यात एक महाबली, बाहुबली शेफ काम करताना दिसत आहे. याचे नाव आहे आंद्रे रश. लोक त्याच्या पाककौशल्याने किती प्रभावित झालेत याचा अंदाज येऊ शकलेला नाही मात्र सोशल मिडियावर आंद्रेच्या पिळदार बाहूंची चर्चा जोरात सुरु आहे. हे फोटो अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी रमादाननिमित्त दिलेल्या मेजवानीचे असून या मेजवानीला ३०-४० लोकांना आमंत्रण दिले गेले होते. त्या पार्टीच्या तयारीसाठी आंद्रे व्हाईट हाउस मध्ये आला होता. अर्थात तो येथे नेहमीच अश्या महत्वाच्या मेजवानीच्या वेळी येतो पण तो व्हाईट हाउसचा कायमचा स्वयंपाकी नाही.


व्हायरल झालेल्या फोटोत आंद्रे बरोबर अन्य तीन शेफ दिसत आहेत पण सर्वात लक्षवेधी ठरलेत ते आंद्रेचे बायसेप्स. हे बायसेप्स २२ इंचांचे आहेत. आंद्रे अमेरिकन लष्करातून मास्टरशेफ म्हणून निवृत्त झाला आहे. काही काळापूर्वी त्याने २२२२ पुशअप मारून अशीच प्रसिद्धी मिळविली होती. आर्मीतून निवृत्त झालेल्या २२ ज्येष्ठांनी आत्महत्या केल्या होत्या आणि मामला फारच गरम झाला होता. तेव्हा आंद्रेने अवेअरनेस कॅम्पेन म्हणून हे पुशअप मारले होते.


आंद्रे अतिशय उत्तम प्रतीचा केक डेकोरेटर आहे आणि तो हिमशिल्पे बनविण्यात फारच माहीर आहे. तो फ्री लान्सर शेफ म्हणून काम करतो आणि बड्या मेजवान्या, डिनर्ससाठी त्याला आवर्जून त्याचे पाककौशल्य दाखविण्यासाठी बोलावले जाते. १९९७ पासून तो व्हाईट हाउस मध्ये प्रासंगिक वेळी शेफ म्हणून येतो. ४५ वर्षाचा आंद्रे जगभरातील अनेक पाकस्पर्धात सामील झाला आहे आणि त्याने बक्षिसे मिळविली आहेत. आर्मीमध्ये तो मिलिटरी टॉप ब्रासचा शेफ म्हणून काम करत असे.


मोठमोठे बर्थडे केक हि आंद्रेची खासियत असून आर्मीच्या अॅनिव्हर्सरी सेलेब्रेशनमध्ये त्याचा केक असतोच. त्याने एकदा १६ फुट लांबीचा केक डेझर्ट म्हणून बनविला होता. तो आर्मी मध्ये वापरल्या जाणाऱ्या कॅमोफ्लेज मोठ्या गाडीच्या आकाराचा होता. तो चॉकलेटपासून अनेक सुंदर कलाकृती तयार करतो. आंद्रेचे बाहू बलशाली दिसत असले तरी त्याची बोटे सच्च्या कलाकाराची आहेत. तो सध्या कॉम्बॅट फूड मेडिक नावाचे पुस्तक लिहितो आहे. त्यात निवृत्त लष्करी जीवनातील आहाराविषयी माहिती आहे. आंद्रे सांगतो बॉडी बिल्डींग साठी त्याने कधीही स्टेरोइडचा वापर केलेला नाही.

Leave a Comment