हार्दिक पांड्याचे वर्ल्ड कप साठी खास हिरे दागिने


इंग्लंड मध्ये सध्या सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमधली चुरस वाढू लागली आहे आणि खेळाडूंचे अनेक किस्से सोशल मिडीयावर चर्चेत येऊ लागले आहेत. भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या त्याच्या चैनीच्या लाइफस्टाइलमुळे तसाही चर्चेत असतोच. आता त्याने या वर्ल्ड कपसाठी खास बनवून घेतलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांमुळे चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्याचे बालपण गरिबीत गेले आहे मात्र आता तो जीवनाचा आनंद भरभरून लुटताना दिसतो. यामागे त्याने मिळविलेले यश हे कारण आहे.

हार्दिक यंदा वर्ल्ड कपला येताना मैदानातील तयारीबरोबरच त्याच्या खास वस्तू घेऊन आला आहे. यावेळी तो डायमंड थीमवर आधारित त्याचे दागिने, घड्याळ घेऊन आला असून बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकौंटवर युवराज चहल याने त्यांची घेतलेली मुलाखत चर्चेत आली आहे. यात हार्दिकने त्याचे हिरे प्रेम वर्णन केले आहे आणि घातलेले दागिने दाखविले आहेत.


वर्ल्ड कप साठी हार्दिकने हिऱ्यांचे खास पेंडन्ट बनवून घेतले असून त्यात बॅट आणि बॉलचे डिझाईन केले गेले आहे. चेंडूची सीम काळ्या रंगाची आहे. हिऱ्याची अंगठी, चेन आणि घड्याळ असे हे दागिने आहेत. पैकी त्याचे घड्याळ पाटेक फिलीप नॉटीलुइस कंपनीचे असून त्याची किंमत आहे तब्बल ३ कोटी रुपये. १८ कॅरेट गोल्ड मध्ये बनविलेल्या या घड्याळावर हिरे जडविले गेले आहेत. हार्दिकची चेन, अंगठी अशीच किमती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हार्दिकला महागड्या वस्तूंचा शौक आहे. तो १ लाख रु.किमतीचे शर्ट आणि ८५ हजार रु. किमतीचे स्नीकर वापरतो. काही महिन्यांपूर्वी कॉफी वुईथ करन या शोमध्ये महिलांसंदर्भात वादग्रस्त विधाने करून तो चांगलाच अडचणीत आला होता आणि बीसीसीआयने त्याचे निलंबन करून ऑस्ट्रेलियातून त्याला परत भारतात पाठविले होते. त्यानंतर त्याच्यावरील निलंबन मागे घेतले गेले असून तो पुन्हा टीम इंडिया मध्ये सामील झाला आहे.

Leave a Comment