तेलंगणातील ट्रम्प भक्ताने स्थापन केली सहा फुटी मूर्ती


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल कोणाला काय वाटते हा चर्चेचा विषय असला तरी डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात एक परमभक्त लाभला आहे. तेलंगण राज्यातील जंगम गावाचा शेतकरी बुसा कृष्ण असे या भक्ताचे नाव आहे. त्याने नुकतीच ट्रम्प यांची सहा फुट उंचीची मूर्ती स्थापन केली असून तो रोज या मूर्तीची पूजा करणार आहे. ट्रम्प यांचा ७३ वा वाढदिवस १४ जून रोजी साजरा झाला त्या दिवसाचे औचित्य साधून कृष्णाने या मूर्तीची स्थापना केली आहे. त्याने या मूर्तीला दुधाचा अभिषेक सुद्धा केला आहे. भारतात दुसऱ्या देशाच्या प्रमुखाची अशी मूर्ती स्थापन करून पूजण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.

कृष्णा प्रसिद्धीच्या झोतात आला तो त्याने त्याच्या देवघरात ट्रम्प यांचा फोटो लावून अन्य देवांप्रमाणे त्या फोटोलाही हळद कुंकू फुले वाहून त्याची पूजा केली तेव्हा. अर्थात कृष्णा हे केवळ प्रसिद्धीसाठी करत नाही असे त्याचे म्हणणे आहे. तो सांगतो, २०१७ मध्ये तेलंगणातील एक सॉफ्टवेअर इंजिनिअर श्रीनिवास युएस नेव्हीच्या एका अधिकाऱ्याकडून वर्णद्वेषातून मारला गेला होता. त्यामुळे अश्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून तो ट्रम्प यांची प्रार्थना करतो.


तो सांगतो भारतीय संस्कृतीत द्वेषाला जागा नाही. भारतीयांच्या मनाचा मोठेपणा त्यांच्या प्रेमातून दिसतो. आपले हे प्रेम ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचेल आणि वर्णद्वेषाच्या घटना पुन्हा घडणार नाहीत अशी कृष्णाला आशा आहे. तो म्हणतो, मी मनापासून यासाठी प्रार्थना करतो आणि एक दिवस ती ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचेल असा विश्वास आहे. कृष्णा म्हणतो तो ट्रम्प याच्याशिवाय अन्य कुणाही अमेरिकन माणसाला ओळखत नाही. एक दिवस व्हाईट हाउस मध्ये जाऊन ट्रम्प यांची भेट घेण्याची त्याची इच्छा आहे.

Leave a Comment