जगातील एकमेव स्टेडीयम, ज्यातून धावते झुकझुक गाडी


स्टेडीयम मध्ये खेळाचे सामने प्रत्यक्ष पाहणे हा रोमांचक अनुभव असतो. आजकाल टीव्हीवर जगभरातील विविध देशात सुरु असलेले सामने सहज पाहण्याची सुविधा आहे मात्र तरीही शक्य असले तेव्हा स्टेडियम मध्ये जाण्यासाठी क्रीडाप्रेमी उत्सुक असतात. प्रेक्षकांचा हल्ला गुल्ला, आरडाओरड खेळाडूंसाठी प्रेरणा देतात आणि खेळातील उत्कंठा वाढविण्याचे काम करतात. जगात यामुळेच एक सो एक सुंदर स्टेडीयम बांधली गेली आहेत. काही ठिकाणी एकाचवेळी १ लाख प्रेक्षक बसण्याची व्यवस्थाही आहे. मात्र या सारयाहून वेगळे एक अनोखे किंवा युनिक म्हणता येईल असे स्टेडीयम स्लोवाकियाच्या सीएरनि बालोग या गावात आहे. फुटबॉलच्या या मैदानातून चक्क रेल्वे गाडी दररोज जाते आणि म्हणून ते वेगळे आहे.


या मैदानात रेल्वे रूळ आहेत. हा भाग १३ गावांचा समूह असून त्याला नगरपालिका आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे नाझी विरोधी स्लोवाक राष्ट्रीय विद्रोहाचे केंद्र होते. १९०० च्या शतकात एक रेल्वे लाईन येथे टाकली गेली. त्याचा उद्देश लाकूड वाहून नेणे असा होता. त्यासाठी हा १,३२,००० किमी लांबीचा मार्ग बांधला गेला. १९१४ मध्ये हे काम पूर्ण झाले तेव्हा येथे फुटबॉल मैदान नव्हते.

१९८२ मध्ये येथेली रेल्वे वाहतूक थांबली पण १० वर्षांनी ती पुन्हा सुरु झाली. तेव्हा रेल्वे रूळाशेजारीच फुटबॉल मैदान तयार केले गेले. तेव्हा हा मार्ग हेरीटेज रेल्वे म्हणून पर्यटकांसाठी सुरु केला गेला. आता हा मार्ग १७ किमीचा असून त्यावरून दररोज वाफेच्या इंजिनाची गाडी झुकझुक करत धावते. हे स्टेडियम छोटे आहे. त्यात दोन स्टँड असून या स्टँडच्या समोरून रेल्वे रूळ जातात.

Leave a Comment