खासदार साध्वी प्रज्ञा यांच्या शपथविधी दरम्यान विरोधकांचा गोंधळ


नवी दिल्ली – लोकसभेत भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या शपथविधी दरम्यान विरोधकांनी गदारोळ केला. साध्वी प्रज्ञा यांच्या नावामुळे हा वाद झाला. संस्कृतमध्ये शपथ घेण्यास साध्वी प्रज्ञा यांनी सुरुवात केली. स्वतःच्या नावाचा उच्चार त्यांनी ‘साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी’ असा केला. विरोधी पक्षातील खासदारांनी त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यामुळे शपथविधीदरम्यान साध्वी प्रज्ञा थांबल्या.

त्यांच्या नावावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत केवळ स्वतःचेच नाव त्यांनी घ्यावे, असे म्हटले. साध्वी प्रज्ञा यांनी यावर हे आपलेच नाव असल्याचे सांगितले. सभापतींनी या वादानंतर रेकॉर्ड तपासले. रेकॉर्डमध्ये असलेल्या नावानेच त्यांना शपथ घेता येईल, असे सांगितले. दरम्यान, साध्वींच्या समर्थनार्थ अनेक भाजप खासदारांनीही घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

डॉ. वीरेंद्र कुमार यांच्याकडे लोकसभा खासदारांच्या रेकॉर्डची फाईल नेण्यात आली. रेकॉर्ड त्यांनी तपासले. यादरम्यान विरोधकांचा गदारोळ चालूच होता. दुसऱ्यांदा साध्वी प्रज्ञा यांनी शपथ घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर विरोधकांचा आवाज वाढला. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा थांबावे लागले. शेवटी तिसऱ्यांदा त्या शपथ पूर्णपणे घेऊ शकल्या.

Leave a Comment