महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांनी घेतली मराठी भाषेतून शपथ


नवी दिल्ली – सोमवारपासून 17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा संसदेच्या पहिल्या दिवशी पार पडला. हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनेक खासदारांनी शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील खासदार कोणत्या भाषेत शपथ घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांची मराठी भाषेतून शपथ घेतली. भाजपचे रावसाहेब दानवे, शिवसेनेचे अरविंद सावंत या केंद्रीय मंत्र्यांनी खासदारकीची शपथ मराठीतून घेतली. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, धैर्यशील माने, नवनीत राणा, प्रितम मुंडे यांनी लोकसभेत मराठीतून शपथ घेतली. औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील हे कोणत्या भाषेत शपथ घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती पण त्यांनी चक्क मराठीतून शपथ घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.

तर सुप्रिया सुळे यांनी हिंदीतून आणि, सातारचे खासदार उदयनराजे भोसले, डॉ. सुजय विखे यांनी इंग्रजीतून सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यात विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभा मतदासंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली त्याचसोबत त्यांनी संसदेत जय शिवराय, जय महाराष्ट्र असे उच्चारताच जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणाबाजी झाली.

भाजपचे मनोज कोटक, शिवसेनेचे विनायक राऊत, ओमप्रकाश निंबाळकर,सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, गजानन किर्तीकर यांच्यासह अन्य खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. पूनम महाजन, हिना गावित, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, गोपाळ शेट्टी ह्यांनी हिंदीतून शपथ घेतली तर सुजय विखे यांनी इंग्रजीमधून तर गिरीष बापट, उन्मेश पाटील, सुनील मेंढे ह्यांनी संस्कृत मधून शपथ घेतली.

Leave a Comment