विंग्स फोल्ड होणारी उडती कार अस्का


वाहतुकीच्या गंभीर प्रश्नावर तोडगा म्हणून अनेक कंपन्या उडत्या कार्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकन स्टार्टअप नेक्स्ट फ्युचर मोबिलिटीने दिसायला एखाद्या सर्वसामान्य एसयुव्ही प्रमाणे असलेली पण फोल्डिंग विंग्सच्या मदतीने आकाशात उडू शकणारी कार अस्का या नावाने सादर केली आहे. अस्का या जपानी शब्दाच्या अर्थ उडणारी चिमणी असा आहे. ही इलेक्ट्रिक कार व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग करणारी आहे. यात पायलट सह तीन प्रवासी बसू शकतात.

या कार्सचे विंग्स उडत असताना बाहेर उघडतात. कारच्या बॉडीमध्ये १० पंखे, मागे दोन पंखे तर विंग्सच्या दोन्ही बाजूला १-१ पंखा दिला गेला आहे. असे एकूण १४ पंखे कारमध्ये आहेत. ते ड्रोनसारख्या दिसणाऱ्या या कारला जमिनीवरून आकाशात उडण्यासाठी बळ देतात. फ्लाईट मोड मध्ये विंग्स सरळ होतात तर रस्त्यावर धावताना ते फोल्ड होऊन आत जातात. या कारला रिचार्जेबल बॅटरी दिली गेली असून विंग्सना पॉवर त्यातून मिळते. एकदा फुलचार्ज केल्यावर ही कार एका प्रवाशासह ५६३ किमी तर तीन प्रवाशांसह २४१ किमी अंतर कापू शकते असा दावा कंपनीने केला आहे. या कारचा सर्वाधिक वेग किती असेल याचा खुलासा केला गेलेला नाही.


स्टँडर्ड एसयूव्ही मधून फ्लायिंग कार मध्ये बदल होत असला तरी नेहमीचा रस्त्यावर ही कार टेकऑफ आणि लँडिंग करू शकत नाही. टेस्टिंगसाठी खास लँडिंग लाँचिंग पॅडस बनविली जात आहेत. २०२५ च्या सुमारास ती बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार हा सेल्फ फंडिंग प्रोजेक्ट असून फुल स्केल प्रोटोटाईप बनविण्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्स लागणार आहेत. कंपनी त्यासाठी ऑटोनॉमस टेक्नोलॉजी बनवीत आहे. त्यामुळे ही कार बिना चालक सुद्धा उडू शकणार आहे.

Leave a Comment