मोबाईल वेडा पोपट कोको


मोबाईल हा आजकाल जीवनाचा अविभाज्य अंग बनला असून दिवसरात्र प्रत्येक माणूस मोबाईलच्या अधीन झालेला पाहायला मिळतो आहे. हे एक प्रकारचे व्यसन आहे असे शास्त्रज्ञ सांगू लागले असले तरी ते फार कुणी मनावर घेत नसल्याचे चित्र आहे. मोबाईलचा खूप जास्त उपयोग होतो हे मान्य केले तरी त्याचा दुरुपयोग सर्वात जास्त होतो हे सत्य आहे. आता मोबाईलचे हे व्यसन माणसांपुरते मर्यादित राहिले नसून प्राणी पक्षी सुद्धा त्याच्या प्रेमात पडल्याची उदाहरणे दिसू लागली आहेत.

याचे सर्वात ताजे उदाहरण आहे कोको नावाचा पोपट. हा पोपट ऋषी शर्मा याचा पाळीव पोपट असून त्याचे वेगळेपण म्हणजे तो पिंजऱ्यात बंद नाही तर घरभर त्याचा संचार असतो. या पोपटाला मोबाईलचे इतके प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे कि हातात मोबाईल नुसता दिसला तरी तो लगेच मोबाईल जवळ येतो. त्याचे खाणे पिणे सर्व मोबाईल समोर बसून होते. दर अर्ध्या तासाने त्याला मोबाईल दाखवावा लागतो अन्यथा तो ओरडून ओरडून घर डोक्यावर घेतो आणि मोबाईल दिसताच आनंदाने चित्कारतो.

ऋषी शर्मा याच्याकडे एक जर्मन शेफर्ड कुत्रेही आहे. कोको आणि या कुत्र्याची चांगली दोस्ती आहे. ते दोघे छान खेळतात मात्र थोडा वेळ गेला कि कोकोला मोबाईलची आठवण येते आणि त्याचा दंगा सुरु होतो. शर्मा कुटुंबीय कोको ला मोबाईलवर काही व्हिडीओ दाखवितात. कोको लगेच शांत होतो आणि व्हिडीओ पाहायला लागतो. या कोकोचे व्हिडीओ ऋषी शर्मा यांनी शेअर केले असून त्याला अनेकांकडून प्रतिसाद मिळतो आहे.

Leave a Comment