झीनत अमान ‘पानिपत’मधून करणार सिनेसृष्टीत पुनरागमन


हिंदी सिनेसृष्टीत ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान पुनरागमन करणार आहेत. झीनत अमान दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी ‘पानिपत’ चित्रपटात छोटेखानी भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे कथानक अफगाण आणि मराठ्यांमध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर बेतलेले आहे.

अभिनेता संजय दत्त अहमद शाह अब्दालीची व्यक्तिरेखा साकारत असून अभिनेता अर्जुन कपूर त्याला लढा देणाऱ्या मराठा योद्धा सदाशिव रावांच्या भूमिकेत झळकणार आहे. यामध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉनही सदाशिवरावांची दुसरी बायको पार्वतीबाई यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सकीना बेगमची भूमिका झीनत अमान साकारणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर चित्रपटात मोहनीश बहल, कुणाल कपूर, पद्मिनी कोल्हापुरेही दिसणार आहेत.

झीनत अमान साकारत असलेल्या सकीना बेगम या होशियारगंजच्या शूर लढवय्या होत्या. सदाशिवरावांना त्यांनी मदत केल्याची नोंद आढळते. पुढील आठवड्यात चित्रिकरणाला झीनत अमान सुरुवात करणार आहेत. त्यांचा या चित्रपटातील लूक कसा असेल, याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या राजस्थानमध्ये सुरु आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर 2019 रोजी रिलीज होणार आहे.

झीनत अमान यांनी आशुतोष गोवारीकरसोबत 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गवाही’ चित्रपटात काम केले होते. ते ‘पानिपत’च्या निमित्ताने तब्बल तीस वर्षांनी एकत्र येत आहेत. झीनत अमान यांनी सत्तर आणि ऐंशीच्या दशकात अनेक ग्लॅमरस भूमिका साकारल्या होत्या.

Leave a Comment