कर्जबुडव्यांच्या यादीत बिर्ला समूहातील यशोवर्धन बिर्लांचा समावेश


मुंबई – युको बँकेने देशातील आघाडीच्या बिर्ला समूहातील यशोवर्धन बिर्ला यांना कर्जबुडवा म्हणून जाहीर केले आहे. यशोवर्धन बिर्ला सुर्या लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. सरकारी बँक असलेल्या युको बँकेचे त्यांच्या कंपनीने ६७.६५ कोटी रुपये थकविले आहेत.

यश बिर्ला ग्रुपचे यशोवर्धन बिर्ला हे चेअरमनदेखील आहेत. बँकेने जाहीर केलेल्या नोटीसमध्ये यशोवर्धन यांनी थकविलेले कर्ज हे अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) म्हणून ३ जून २०१९ ला घोषित करण्यात आल्याचे म्हटले आहे. १०० कोटीच्या मर्यादेपर्यंत कर्ज द बिर्ला सूर्या लिमिटेडला मंजूर करण्यात आले होते. मुंबईतील नरिमन पाँईट येथील मफतलालच्या कॉर्पोरेट शाखेकडून हे कर्ज देण्यात आले आहे. एनपीए घोषित केल्यानंतरही कंपनीने या कर्जाचे व्याज आणि ६७.६५ कोटी रुपये थकविले आहेत.

कर्जदाराने अनेकदा नोटीस देवूनही पैसे भरले नसल्याचे बँकेने म्हटले आहे. युको बँकेची १९४३ मध्ये उद्योगपती जी.डी. बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापना झाली होती. यशोवर्धन यांचे जी.डी. बिर्ला हे पणजोबा रामेश्वर दास बिर्ला यांचे भाऊ होते. उद्योजकांनी कर्ज बुडविल्याने सरकारी बँका आर्थिक संकटात सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या उद्योग समुहाकडूनही कर्ज थकविल्याची प्रकरण समोर आल्याने सरकारी बँकांच्या एनपीएचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment