तिरुपती बालाजीला तामिळनाडूच्या उद्योजकाने दान केले सोन्याचे दोन हात


तिरुपती – जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असणाऱ्या तिरुपती बालाजीला भक्तांकडून दरवर्षी सोने, चांदी, हिरे आणि पैशांमध्ये कोट्यावधींचे दान केले जाते. आता आणखी एका भक्ताने त्यात भर घातली आहे. चक्क सोन्याचे दोन हात तामिळनाडूचा असलेल्या या भक्ताने बालाजीला समर्पित केले आहेत. थंगा दुराई या भक्ताचे नाव असून ते एक व्यापारी आहेत. प्रत्येकी सहा किलो असे ‘अभय हस्तम’ आणि ‘काति हस्तम’ असे नाव असणाऱ्या या हातांचे वजन आहे. तब्बल 2.25 कोटी रुपये सोन्याच्या हातांची किंमत सांगितली जात आहे. याबाबत माहिती देताना तिरुमाला तिरुपती देवदर्शनम (टीटीडी) ने सांगितले की, या हातांची शनिवारी सकाळी विधीवत पूजा करुन अर्पण करण्यात आले.

हे दान तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील व्यापारी थंगा दुराई यांनी अर्पण केले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, व्यंकटेशला ते लहानपणापासून आपले दैवत मानतात. लहान असताना ते एका आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांची वाचण्याची शक्यता कमी होती. पण त्यांनी तिरूपतीला प्रार्थना केल्यानंतर त्यांचा आजार पूर्णपणे बरा झाल्यामुळे थंगा यांनी बालाजीला सोन्याचे हात दान करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment