नायजेरियातील या शाळेत फी ऐवजी सांगतात प्लास्टिक बाटल्या जमा करण्यास


लागोस – जगभरात पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. कार्बन उत्सर्जनामुळे अनेक समस्या वाढल्या आहेत. त्यातच प्लास्टिक हा तर खूप चिंतेचा विषय आहे. त्याचमुळे या जगातील एका देशातील एका शाळेने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. विद्यार्थ्यांकडून शुल्कापोटी पालकांकडून प्लास्टिक बाटल्या घेण्याचा अनोखा उपक्रम नायजेरियाच्या लागोस शहरातील एका शाळेने सुरू केला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना एका बॅगेत प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्या भरून घेऊन जाव्या लागतात. त्यांचे वजन करून होणाऱ्या किमतीतून मुलांकडून शुल्काची रक्कम काढून घेतली जाते.

या उपक्रमाचे या शाळेचे तसेच विद्यार्थ्यांचे दोन फायदे झाले आहेत. एक म्हणजे कुटुंबावरील आर्थिक बोजा कमी झाला. तर दुसरा असा की, यामुळे शहरातील पर्यावरण प्रदूषण देखील कमी झाले. आफ्रिकन क्लीन अप इनिशिएटिव्ह व व्हिसायकलर्स संस्थांच्या सहकार्याने नायजेरियातील हा प्रकल्प मॉरिट इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू करण्यात आला. हा उपक्रम लवकरच इतर शाळांमध्येही लागू करण्याची योजना आहे. ही योजना सुरू झाल्यामुळे पालक समाधानी आहेत. आता पैशांची कमतरता असल्याने शाळा सोडावी लागणार नाही. अजेनगुले येथील रहिवासी शेरिफत ओंकुवो यांच्या मते, शाळेची फी भरण्यासाठी पूर्वी खूप संघर्ष करावा लागायचा. अनेकदा तर निम्मी फी भरावी लागायची. बाकी नंतर थोडी भरू शकत होतो. या योजनेमुळे बरीच कामे सुकर झाली आहेत. एक अन्य पालक जेन अनियाना म्हणाले, आता शुल्काचा बोजा कमी वाटू लागला आहे.

शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ही योजना प्रभावी ठरली आहे. पूर्वीच्या तुलनेत आम्ही कमी कालावधीत सर्व शुल्क घेऊ शकतो. ही शाळा पालक, मुलांसाठी अतिशय चांगली भेट म्हणावी लागेल. लागोसमधील सर्वात मोठी लोकवस्ती अजेनगुले ही आहे. ही वस्ती सुमारे ३० लाख लोकांची आहे. या प्रकल्पाची सुरुवात केल्यामुळे परिसर स्वच्छ राहू लागला आहे. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचेही प्रमाण कमी झाले.

Leave a Comment