२९ टक्के कुटुंबांना नकोसा झाला आहे बाप


मुंबई : जगभरात काल ‘फादर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पण ‘फादर्स डे’ साजरा करतानाच एक कटू सत्य समोर आले आहे. ‘फादर्स डे’चे डीपी ठेवणाऱ्या २९ टक्के शहरी कुटुंबांना ज्येष्ठ नागरिक नकोसे झाल्याचे एका पाहणीत समोर आले आहे.

हे धक्कादाक सत्य ‘हेल्पेज इंडिया’ या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहेत. म्हातारे आई-बाबा २९ टक्के लोकांना ओझे वाटतात. आई-वडिलांवर २५ टक्के लोक राग काढतात. आई-वडिलांच सांभाळ करताना ३५ टक्के लोकांना आनंद वाटत नाही. तर सासू-सासऱ्यांच्या देखभालीचे काम ६८ टक्के सुना नोकरांवर टाकतात. ही धक्कादायक आकडेवरील समोर आल्यानंतर घरातील ज्येष्ठ नागरिक नकोसे झाल्याचे अधोरेखित होत आहे.

जोपर्यंत घरातील वडिलधारी माणसे कमवती असतात तोपर्यंत ते आपल्यासाठी देव असतात, पण जेव्हा मुलांवर त्यांच्या देखभालाची जबाबदारी पडते तेव्हा ते नकोसे होतात. आजकालच्या काळात वडिलधाऱ्या व्यक्तींना घरात समान वागणूक मिळत नाही. असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या योजना घरत यांनी केले आहे.

कुटुंबाचा ज्येष्ठ नागरिक हा आधार असतो. अनेक उन्हाळे-पावसाळे त्याने पाहिलेले असतात. आता हाच आधारवड कुटुंबाला नकोसा झाला आहे. घराच्या आधारवडाची रवानगी जर वृद्धाश्रमात केली जात असेल तर कुटुंबव्यवस्था कशी मजबूत राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment