उष्मघातामुळे बिहारमधील १८४ जणांनी गमावला जीव


पटना – उष्णतेच्या लाटेमुळे बिहारमध्ये सध्याच्या घडीला भीषण परिस्थिती असून आतापर्यंत १८४ जणांनी उष्मघातामुळे आपला जीव गमावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ३० जूनपर्यंत सरकारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर १४४ कलम गया येथील जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आहे. कोणतेही सरकारी अथवा खासगी बांधकाम, मनरेगा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उघड्या ठिकाणी कार्यक्रमांचे सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत आयोजन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

लोकांचे मृत्यू उष्मघातामुळे होत असल्याने तेथील परिस्थिती भीषण होत चालली आहे. उष्मघातामुळे आतापर्यंत १८४ जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात १०० जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फक्त गेल्या ४८ तासांत ११३ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. औरंगाबाद, गया आणि नवादा जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. याठिकाणी एकूण ६१ मृत्यू झाले आहेत.

उष्मघाताचा फटका लहान शाळकरी मुलांना बसू नये यासाठी ३० जूनपर्यंत बिहारमधील सर्व सरकारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची ताप आणि उलट्या होणे ही मुख्य लक्षणं आहेत. मृतांच्या नातेवाईकांसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर नितीश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment