शहिदाच्या बहिणीची कमांडोनी केली भावूक पाठवणी


लग्न किंवा विवाह हा आपल्या संस्कारातील एक महत्वाचा संस्कार मनाला जातो. पण हे लग्न देशासाठी शहीद झालेल्या भावाच्या बहिणीचे असेल तर त्याला आणखी वेगळा संदर्भ येतो. असेच एक वऱ्हाडी लोकानाच नाही तर वरपक्षाला गहिवरून आणणारे लग्न बिहार पाध्ये नुकतेच पार पडले आणि वधूपक्षाला सुद्धा तो सुखद धक्का ठरला. हे लग्न होते काश्मीरच्या बांदीपोरा भागात १८ नोव्हेंबर २०१७ साली दहशतवाद्याशी लढताना शहीद झालेल्या भारतीय हवाई दलाच्या गरुड पथकातील ज्योतिप्रकाश निराला या कमांडोच्या धाकट्या बहिणीचे. ३ जूनला पार पडलेल्या या लग्नाला सख्खा भाऊ नाही याचे दु:ख मिटविले हवाई दलाच्या गरुड युनिट मधील ५० कमांडोजनी.


हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनोवा आणि गरुड कमांडो युनिटला लग्न असल्याची माहिती होतीच. त्यामुळे ५० कमांडोचे पथक निराला यांची बहिण शशिकला हिच्या लग्नादिवशी घरी हजर झाले. लग्नाची सर्व जबाबदारी त्यांनी पार पाडलीच पण शशिकलाची सासरी पाठवणी करण्याची वेळ आली तेव्हा या कमांडोने त्यांच्या हातांच्या तळव्यांच्या पायघड्या जमिनीवर घातल्या आणि त्यावरून शशिकला चालत गेली. भावाने करायचे ते सर्व विधी या कमांडोनी पार पडले. वर पक्ष सुद्धा हा प्रकार पाहून सद्गदित झाला आणि त्यांनी या घरातील मुलगी सून म्हणून लाभली याचा अभिमान वाटतो अशी भावना व्यक्त केली.


ज्योतिप्रकाश या कुटुंबातील एकुलता एक मुलगा. त्यांना तीन बहिणी. त्यांची आई लग्नातील या प्रसंगानंतर बोलताना भरून आलेल्या गळ्याने म्हणाली, ज्या आईला इतकी मुले आहेत तिला कशाची चिंता? आज मला कळले, शहीद मुलाचा परिवार कधी एकदा नसतो तर सारा देश त्यांच्या सोबत असतो.

ज्योतिप्रकाश यांना काश्मीर मधील बांदीपोरा येथे दहशतवाद्याशी मुकाबला करताना २०१७ साली वीरमरण आले होते. मात्र शेवटचा श्वास घेण्यापृवी त्यांनी दोन धोकादायक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते त्यात लष्कर कमांडर लखवी याचा भाचा उबेद उर्फ ओसामा आणि महमूद यांचा समावेश होता. या वेळी सहा कुख्यात अतिरेकी गरुड कमांडो युनिटने ठार केले होते. २६ जानेवारीला ज्योतीप्रकाश यांना मरणोत्तर अशोकचक्र देऊन त्यांच्या मर्दुमकीचा सन्मान केला गेला होता. शांतीकाळात दिला जाणारा हा सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे.

Leave a Comment