पुतीन यांच्याकडून शी जिनपिंगना वाढदिवसाला आईसक्रीम भेट


चीन मध्ये कोणत्याही बड्या नेत्याचा जन्मदिवस गुप्त राखण्याची पद्धत असून तो सार्वजनिक स्वरुपात कधीच साजरा केला जात नाही. त्यांच्या जन्माची खरी तारीख हे राष्ट्रीय गुपित मानले जाते. अश्या वेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना वाढदिवसाचे प्रेझेंट दिले जाणे आणि त्यांनी ते स्वीकारणे ही बातमी बनल्यास नवल ते काय? शी जिनपिंग यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी त्यांना आईसक्रीम भेट म्हणून दिले आणि शी यांनी ते आनंदाने स्वीकारुन रिटर्न गिफ्ट म्हणून पुतीन यांना चीनी चहा भेट दिल्याचे वृत्त रशियन आणि चीनी मिडीयाने दिले आहे.


सर्वसाधारणपणे चीन आणि रशियात महत्वाच्या नेत्यांच्या खासगी आयुष्यावर फारसे बोलले जात नाही. तरीही रशियन मिडीयाने या दोन प्रमुख नेत्यांचे फोटो प्रकाशित केले आहेत. त्यात शी आणि पुतीन आईस्क्रीम बॉक्स पाहताना आणि दुसऱ्या फोटोत हातात शँपेनचे ग्लास घेतलेले असताना दिसत आहेत. वाढदिवसाचे प्रेझेंट देताना पुतीन यांनी शी यांना शुभेच्छा दिल्याच पण तुमच्यासारखी व्यक्ती माझी दोस्त आहे याचा आनंद होत असल्याचे सांगितले.

शी जिनपिंग तीन दिवसांच्या दौर्यावर रशियाला गेले होते. कॉन्फरन्स ऑफ इंटरॅक्शन अँड कॉन्फिडन्स बिल्डींग इन एशिया परिषदेची पाचवी बैठक कझाकिस्तान येथे झाली त्या निमित्ताने शी जिनपिंग रशियाला आले होते. या बैठकीला २७ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर ज्या हॉटेल मध्ये शी जिनपिंग उतरले होते तेथे भेट देऊन पुतीन यांनी शी जिनपिंग ना वाढदिवस शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आईस्क्रीम, फ्लॉवरपॉट आणि केक भेट दिला. शी जिनपिंग यांनी पुतीन यांना तुम्ही चीन मध्ये खूपच लोकप्रिय आहात असे सांगितले. अर्थात केक आणि आईस्क्रीमचा आस्वाद शी जिनपिंग यांनी घेतला का नाही ते समजू शकलेले नाही.

Leave a Comment