काय सांगतात हे निरनिराळे लाफिंग बुद्ध ?


आजच्या काळामध्ये शारीरिक आणि मानसिक तणाव अगदी लहान मुलांपासून ते वयस्क लोकांपर्यंत सर्वांच्याच आयुष्यात आहेत. ह्या तणावातून आपले नातेसंबंध, व्यावसायिक आयुष्य, आणि आपले खासगी आयुष्य हे सर्वच प्रभावित होत असते. त्यामुळे घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तणाव कमी करून सकारात्मक ऊर्जा सगळीकडे राहावी ह्यासाठी अनेक जण वास्तुशास्त्राचा किंवा फेंगशुईचा आधार घेताना दिसतात. तसेच अनेक व्यक्ती आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू ठेवणे ही पसंत करतात. ह्यातीलच एक वस्तू म्हणजे ‘लाफिंग बुद्ध’. हसऱ्या चेहऱ्याच्या, अतिशय प्रसन्न दिसणाऱ्या ह्या बुद्धाची मूर्ती सकारात्मक उर्जा, भाग्य आणि सुबत्तेचे द्योतक आहे. ही मूर्ती इतरांना भेट दिल्याने त्याच्या आयुष्यातील, घरामधील तणाव कमी होऊन त्या घरामध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण नांदू लागते.

पण जेव्हा आपण लाफिंग बुद्धची खरेदी करीत असू, तेव्हा निरनिराळ्या आकाराचे आणि काही उभे असलेले, तर काही बसलेले अश्या निरनिराळ्या स्थितीतील लाफिंग बुद्ध पहावयास मिळतात. त्यामुळे ह्या मूर्तींपैकी कोणती मूर्ती घ्यावी असा संभ्रम उद्भाविणे स्वाभाविक आहे. ह्यापैकी प्रत्येक बुद्ध मूर्तीची स्वतःची खासियत आहे, स्वतःचे असे खास गुण आहेत. त्यामुळे लाफिंग बुद्ध खरेदी करताना नक्की कशासाठी आपण ती खरेदी करीत आहोत ह्याचा विचार करून मग आपल्या गरजेनुसार मूर्ती खरेदी करावी. मूर्ती कोणत्याही कारणाने खरेदी केली गेली असो, दररोज ह्या मूर्तीच्या पोटावरून हात फिरवायचा, एवढीच अट, ही मूर्ती प्रभावशाली व्हावी ह्यासाठी आहे.

‘वो लू’ नामक लाफिंग बुद्ध नकारात्मक उर्जा अवशोषित करून त्याचा नायनाट करणारा आहे. ह्या बुद्धाच्या प्रतिमेने घरामध्ये आर्थिक सुबत्ता आणि घरातल्यांना दीर्घायुष्य प्राप्त होत असल्याचे म्हटले जाते. ज्या लाफिंग बुद्धाच्या हातामध्ये सोन्याची नाणी आहेत, अशी प्रतिमा घरामध्ये आर्थिक सुबत्ता आणते. ह्या बुद्धाच्या पाठीवर असलेली भरलेली झोळी, भाग्योदयाचे प्रतिक आहे. ड्रॅगन वर बसलेला लाफिंग बुद्ध आपल्या व्यवसायातील अडथळे दूर करून आपल्याला प्रगतीपथावर नेणारा आहे. ही बुद्धाची प्रतिमा घरातील पूर्वोत्तर दिशेला असावी. क्रिस्टलने बनलेला, हातामध्ये मोत्यांची माला घेतलेला लाफिंग बुद्ध ज्ञानाचे प्रतीक आहे. एकाग्रता वाढविण्यासाठी, आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या टेबलवर ही मूर्ती असावी. सोबत लहान मुलांचा घोळका असलेला लाफिंग बुद्ध घरामध्ये भरभराट आणणारा आहे. ह्या बुद्धाची प्रतिमा आपल्या शयनकक्षामध्ये पश्चिमेला असावी.

Leave a Comment