केजरीवालांच्या मोफत मेट्रो प्रवासाला ई श्रीधरन यांचा विरोध


नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मास्टरस्ट्रोक मारला. दिल्लीतील महिलांना मेट्रो आणि बसेसमध्ये मोफत प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ‘मेट्रो मॅन’ अशी ओळख असलेल्या ई श्रीधरन यांनी आपच्या या प्रस्तावित योजनेला विरोध दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र ई श्रीधरन यांनी लिहिले असून या प्रस्तावाला विरोध करावा असे आवाहन केले आहे.

ई श्रीधरन यांनी मोदींना लिहीलेल्या पत्रात सर, तुम्हाला मी विनंती करतो, मेट्रोत महिलांना मोफत प्रवास करण्याच्या दिल्ली सरकारच्या प्रस्तावाला तुम्ही मान्यता देऊ नये. दिल्ली सरकारला मेट्रोतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची जर काळजी आहे तर त्यांनी त्या महिलांच्या थेट खात्यात प्रवासासाठी लागणारे पैसे जमा करावेत, असे म्हटले आहे.

दिल्ली सरकारने महिलांना प्रवासात सूट दिली तर इतर राज्यातील मेट्रोसाठीही धोक्याची घंटा असेल असे ई श्रीधरन यांनी म्हटले आहे. तसेच दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला 2002 मध्ये सुरुवात झाली तेव्हाच कोणालाही प्रवासात सूट द्यायची नाही हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही प्रसंगी तिकीट काढूनच मेट्रोने प्रवास केला असल्याचे देखील ई श्रीधरन यांनी सांगितले.

Leave a Comment